लिखाणाचा विक्रम करताना कॉपीरायटरचा मृत्यू

जाकार्ता – इंडोनेशियातल्या वाय ऍन्ड आर ग्रुप या जाहिरात संस्थेतील महिला कॉपीरायटर तीन दिवस सलग काम केल्यामुळे म्हणजेच अती थकव्याने मरण पावली. विश्रांतीविना ७२ तास काम केल्यामुळे तिच्या नावावर गिनेज बुक ऑफ रेकॉर्डस्मध्ये विक्रम नोंदला जाणार होता, परंतु तसा मान तर तिला मिळाला नाहीच पण तिला जीवाला मुकावे लागले.

मरण पावलेल्या या कॉपीरायटरचे नाव मिता दिरान असे असून तिचे वडील सुद्धा जाहिरात संस्थांमध्ये कॉपीरायटिंग करण्याचे काम करीत होते. मिता दिरान ही अबोल आणि शांत स्वभावाची कर्मचारी म्हणून ओळखली जात होती आणि तिला क्रेटिन दियांग हे उत्तेजक पेय वारंवार पिण्याची सवय होती. अती काम आणि या उत्तेजक पेयाचे सेवन यांचा परिणाम होऊन तिला हृदयविकाराचा झटका आला असावा, अशीही शक्यता तिच्या सहकार्‍यांनी व्यक्त केली आहे.

ती सलग काम करण्याचा विक्रम प्रस्थापित करण्यास उत्सुक होती, असे तिच्या मित्रांनी सांगितले. तो विक्रम तर प्रस्थापित झाला नाहीच, पण तिच्या मित्रांवर तिला श्रद्धांजली वाहण्याची पाळी मात्र आली.