अमेरिकेकडून दिलगिरी व्यक्त

वॉशिंग्टन – भारताच्या अमेरिकेतील वकिलातीत काम करणार्‍या देवयानी खोब्रागडे यांना देण्यात आलेल्या हिणकस वागणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भारतात संतापाची लाट उसळल्यानंतर अमेरिकेने या प्रकरणात दिलगिरी व्यक्त केली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांना फोन करून त्यांच्या सरकारतर्फे दिलगिरी प्रकट केली.

या एका घटनेवरून भारत आणि अमेरिका यांच्यातील सलोख्याचे आणि सौहार्द्राचे संबंध बिघडता कामा नयेत, अशी अपेक्षा जॉन केरी यांनी व्यक्त केली. अमेरिकेतील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी या देशातली पोलीस यंत्रणा कायदा पालनाच्या बाबतीत आग्रही आहे, त्यामुळे देवयानी खोब्रागडे यांना त्रास सहन करावा लागला याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला.

देवयानी खोब्रागडे या माझ्या मुलीच्या वयाच्या आहेत. त्यामुळे मला त्यांना झालेल्या त्रासाची आणि त्यामुळे झालेल्या मन:स्तापाची चांगलीच कल्पना आहे. भारतात या संबंधात व्यक्त झालेल्या संतापाचीही आपल्या देशाने दखल घेतली आहे, असे जॉन केरी म्हणाले. यापुढे भारतीय अधिकार्‍यांच्या प्रतिष्ठेला बाधा येईल असे अमेरिकन पोलीस काही करणार नाहीत अशी ग्वाहीही केरी यांनी दिली.