सोनिया गांधी यांचा खासदारांना जनतेत जाण्याचा आदेश

नवी दिल्ली – कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कॉंग्रेस सांसदीय पक्षाची बैठक घेऊन पक्षाच्या खासदारांना आपापल्या मतदारसंघात जाऊन सरकारच्या जनकल्याणाच्या योजना जनतेपर्यंत पोचविण्याचे आवाहन केले. चार राज्याच्या विधानसभा निवडणुकात पक्षाचा पराभव झाला असला तरी खासदारांनी निराश होण्याचे काही कारण नाही, असे प्रतिपादन सोनिया गांधी यांनी केले.

खासदारांनी आपले मनोधैर्य कायम राखावेच, पण जनतेचेही मनोधैर्य वाढवावे असे आवाहन त्यांनी केले. चार राज्यातल्या पराभवामुळे आपण एक धडा घेतला आहे. आपण जनतेच्या हितासाठी खूप योजना आखतो, परंतु त्या जनतेपर्यंत पोचत नाहीत म्हणून पराभवाला तोंड द्यावे लागते. एकंदरीत आपल्या योजना लोकांपर्यंत पोचवणे आवश्यक असल्याचे लक्षात आले आहे, असेही सोनिया गांधी म्हणाल्या.

चार राज्यातल्या पराभवाला पक्षातली बेशिस्त आणि बेदिली हीही कारणे असल्याचे सोनिया गांधी यांनी नमूद केले. पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी या कार्यक्रमात आपल्या सरकारच्या दहा वर्षाच्या कामगिरीची माहिती देणारी पुस्तिका प्रकाशित केली. आपला चार राज्यात असा पराभव का झाला याबाबत आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असेही मनमोहनसिंग म्हणाले.

Leave a Comment