दमास्कस – सीरियाची राजधानी दमास्कस या शहराच्या एका उपनगरात अल कायदाशी संबंधित असलेल्या नुसरा फ्रंट या संघटनेने १०० पेक्षाही अधिक लोकांना ठार केले असून गरिबांच्या झोपड्यांमध्ये प्रचंड जाळपोळ केलेली आहे. सीरियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी ही माहिती दिली आहे. नुसरा फ्रंट आणि इस्लाम ब्रिगेड या संघटनांना सौदी अरबस्तान आणि कतार या देशाच्या सरकारांकडून मदत दिली जाते आणि त्यातून या संघटना सीरियामध्ये मोठ्या प्रमाणावर हत्याकांड घडवत आहेत, असे परराष्ट्र मंत्र्यांनी संयुक्त राष्ट्रांकडे पाठविलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
सीरियामध्ये सध्या सत्तांतरासाठी संघर्ष सुरू आहे आणि सीरियाचे सरकार संघर्ष करणार्या बंडखोरांवर अनन्वित अत्याचार करत आहे. त्यामुळे जगभर निषेधाची लाट उमटली आहे. अमेरिकेने सुद्धा सीरियन सरकारच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी जगभरातल्या प्रगत देशांना उद्युक्त करायला सुरुवात केली आहे. परंतु या देशांच्या प्रोत्साहनामुळे सीरियातले बंडखोर अधिकाधिक आक्रमक आणि हिंसक होत आहेत, अशी सीरियन सरकारची तक्रार आहे.
सीरियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी या संबंधात केलेल्या तक्रारीत सौरी अरबस्तान आणि कतार यांना दोष दिला असला तरी प्रत्यक्षात या परराष्ट्र मंत्र्यांचा रोख अमेरिकेकडे आहे आणि संयुक्त राष्ट्र संघटनेने सीरियातल्या प्रगत देशांच्या हस्तक्षेपाची दखल घेऊन त्यांना रोखावे, असे सूचित केले आहे.