हैदराबाद – आंध्र प्रदेशाचे विभाजन करून तेलंगण हे नवीन राज्य निर्माण करण्यासंबंधीचे केंद्रीय मंत्रिमंडळाचे विधेयक राष्ट्रपतींकडून आंध्र विधीमंडळाकडे पाठविण्यात आले तेव्हा विधानसभेत प्रचंड गदारोळ माजला. तेलंगणाला विरोध करणार्या सदस्यांनी या विधेयकाच्या प्रती फाडून फेकून दिल्या. ध्वनीवर्धक उचलून आपटले आणि हे आमदार टेबलांवर चढून थयाथया नाचले. शेवटी या गोंधळामुळे सभापतींनी सदनाचे कामकाज स्थगित केले.
काल हे विधेयक राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडून विधीमंडळाकडे पाठविण्यात आले. या विधेयकावर आंध्र प्रदेश विधीमंडळाने चर्चा करावी आणि आपला अभिप्राय २३ जानेवारीपर्यंत पाठवावा, असे राष्ट्रपतींनी म्हटले आहे. त्यामुळे हे विधेयक काल विधानसभेच्या पटलावर ठेवण्यात आले. तशी घोषणा सभापतींनी केली आणि विधेयकाच्या प्रती सदस्यांना वाटल्या. त्यावेळी तेलंगणविरोधी आमदारांनी घोषणाबाजी सुरू केली.
सर्व सदस्य आपापल्या जागा सोडून सभापतींसमोरच्या सौधात जमा झाले आणि त्यांनी दिलेल्या घोषणांमुळे प्रचंड गदारोळ निर्माण झाला. कॉंग्रेसचे आमदार मधुसुदन गुप्ता आणि वाय.एस.आर. कॉंग्रेसचे आमदार रामचंद्र रेड्डी हे तर सभापतींच्या समोरच्या टेबलावर चढले आणि त्यांनी सभापतींच्या समोरचा माईक ओढून तो फेकून दिला. अशा वातावरणात चर्चाच होऊ शकली नाही, त्यामुळे सभापतींनी कामकाज तहकूब केले.