चीनचे हल्ले वाढण्याची शक्यता

नवी दिल्ली – संरक्षण मंत्री ए. के. अँटनी यांनी गेल्या रविवारच्या चीनच्या घुसखोरीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना चीनकडून असे हल्ले वाढण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. मात्र अशा प्रकारातून युद्ध होऊ नये यासाठी भारत आणि चीन या दोन्ही देशांनी सावध राहिले पाहिजे आणि छोट्या-मोठ्या प्रश्‍नांची सोडवणूक तातडीने केली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे. त्याच दृष्टीने दोन्ही देशांनी करार सुद्धा केलेला आहे असे अँटनी म्हणाले.

भारत आणि चीन यांच्या दरम्यान भरपूर मोठी सीमा आहे. त्यामुळे तिच्यावर कधी ना कधी घुसखोरीचे प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण तरी सुद्धा शांतता राखण्यास भारत वचनबद्ध आहे असे सांगतानाच अँटनी यांनी अशा प्रसंगात दोन्ही बाजूंनी शांततेचाच प्रयत्न केला गेला पाहिजे, असे प्रतिपादन केले.

१९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या स्मरण दिवसानिमित्त म्हणजे विजय दिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अँटनी बोलत होते. दोन दिवसांपूर्वी चीनच्या सैन्याने लडाख भागात चुमेर परिसरात घुसखोरी केलेली होती आणि पाच भारतीयांना पकडून नेले होते. या पार्श्‍वभूमीवर अँटनी बोलत होते.