न्या. गांगुली यांच्यावर राजीनाम्याबाबत दबाव

कोलकत्ता – सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती ए. के. गांगुली यांनी आक्षेपार्ह वर्तन केल्यामुळे दुखावलेल्या त्यांच्या महिला सहकारी वकिलाने गांगुली यांनी आपल्याशी कसकसे वर्तन केले याचे तपशील देणारे प्रतिज्ञापत्र दाखल केले असून त्यातले सर्व तपशील आता उघड झाले आहेत. त्यामुळे न्यायमूर्ती गांगुली यांच्यावर पश्‍चिम बंगाल मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याबाबतचा दबाव वाढत चालला आहे.

या प्रकरणातल्या पीडित महिलेने न्यायमूर्ती गांगुली यांनी आपल्याशी केलेले वर्तन कसे अश्‍लील होते, एवढेच नव्हे तर त्यातून शरीरसंबंधाची इच्छा व्यक्त करणारे संदेश कसकसे दिले होते याची सर्व माहिती एका प्रतिज्ञापत्रात दिली आहे. न्या. गांगुुुली यांनी आपल्याला त्यांच्या सोबत रात्री हॉटेलमध्ये राहण्याचा आग्रह केला, सक्तीने मद्य प्यायला लावले आणि शरीराशी लगट केली असे तिने म्हटले आहे.

एवढे तपशील उघड झाल्यानंतर आता न्या. गांगुली यांना राजीनामा देण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. गांगुली यांच्या बाजूने आता तरी लोकसभेचे माजी सभापती सोमनाथ चॅटर्जी यांच्याशिवाय कोणीही उभे नाही. सोमनाथ चॅटर्जी यांनी या तपशीलात लक्ष न घालता हे प्रतिज्ञापत्र उघड कसे झाले असा प्रश्‍न केला आहे, ज्याला काही महत्व नाही.

या प्रकरणातील एक मोक्याची माहिती अशी की, रात्री या महिलेशी गैरवर्तन केलेल्या न्या. गांगुली यांनी सकाळी तिला एसएमएस पाठवून झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे आणि घडलेला प्रकार आपल्या हातून चुकून घडला असल्याचे म्हटले आहे. शिवाय हा प्रकार कोणालाही सांगू नये अशी विनंती तिला केली आहे.