सोमवारपासून औषध दुकानांचा संप, रुग्णांचे हाल होणार

मुंबई – महाराष्ट्रातील औषध विक्रेते येत्या सोमवारपासून (दि. १६)तीन दिवस संपावर जाणार आहेत, त्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाने औषध विक्रेत्यांबाबत कठोर भूमिका घेतली असून त्याचा निषेध करण्यासाठी हे विक्रेते १६, १७ आणि १८ तारखेला दुकानं बंद ठेवणार आहेत. मात्र विक्रेत्यांच्या संपाला महाराष्ट्र फार्मासिस्ट असोसिएशन या औषध विक्रेत्यांच्या दुसर्‍या संघटनेने विरोध केला आहे.

राज्य सरकारने सुरु केलेली कारवाई योग्य असल्याचा दावा करताना या संघटनेने केला आहे. शिवाय काही विक्रेत्यांनी घोषित केलेला संप बेकायदा असल्याचे या संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात फार्मासिस्ट झालेल्यांची संख्या मोठी आहे. औषध दुकानांमध्ये फार्मासिस्ट नोकरीला ठेवणंही अनिवार्य आहे. मात्र, तरीही अनेक औषध विक्रेते पगार द्यावा लागेल म्हणून फार्मासिस्ट ठेवत नाहीत. त्यामुळे या औषध दुकानदारांनी जनतेच्या जीवाशी खेळ चालवल्याचा आरोपही महाराष्ट्र फार्मासिस्ट अशोसिएशनने केला आहे.