आदर्श सोसायटी सदस्य देवयानी खोब्रागडे यांना न्यूयॉर्कमध्ये अटक

न्यूयॉर्क – माजी सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे यांच्या कन्या आणि वादग्रस्त आदर्श सोसायटीच्या सदस्य असलेल्या डॉ. देवयानी खोब्रागडे यांना न्यूयॉर्कमध्ये अटक करण्यात आली. भारताच्या वाणिज्य दुतावासात उपकौन्सिल जनरल म्हणून त्या कार्यरत असून त्यांना व्हिसा घोटाळा आणि आर्थिक शोषण केल्याप्रकरणी न्यूयॉर्कमध्ये अटक करण्यात आली आहे.

देवयानी खोब्रागडे यांनी अमेरिकेतील आपल्या घरी एका भारतीयाला अत्यंत कमी पैशात नोकर म्हणून कामाला ठेवले होते. या नोकराला अमेरिकेत आणण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आणि अत्यल्प पगार नोकराला देऊन आर्थिक शोषण केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. अमेरिकेत नोकरांशी कसे वागावे, त्यांना किती पगार असावा यासाठी विशिष्ट असे नियम आहेत. मात्र डॉ. देवयानी खोब्रागडे यांनी त्या नियमांचे उल्लंघन केले. याप्रकरणी त्या दोषी आढळल्यास त्यांना कमीत कमी पाच वर्षांची तर जास्तीत जास्त १५ वर्षांची शिक्षा होऊ शकते.

डॉ. देवयानी खोब्रागडे यांनी जर्मनी, पाकिस्तान, इटली येथील भारतीय दूतावासात महत्त्वाची पदे सांभाळली आहेत. परवाना व व्हिसा विभागातील संचालकपदाआधी त्या अर्थ विभागाच्या संचालक होत्या. अमेरिकेत दुतर्फा व्यापार वाढविण्याच्या दृष्टीने संपर्क वाढविणे, एशिया सोसायटी, तसेच वॉशिंग्टनमधील इंडिया कॉकसबरोबर संबंध वाढवून भारताचे हितसंबंध राखणे, सांस्कृतिक देवाणघेवाणीच्या क्षेत्रात दुतर्फा वाटाघाटी साधणे व अमेरिकास्थित भारतीयांना मदत करणे आदी जबाबदारी त्यांच्यावर होती.

Leave a Comment