लोकपाल विधेयक आज राज्यसभेत मांडणार

नवी दिल्ली: गेल्या दोन वर्षांपासून प्रतिक्षेत असलेले लोकपाल विधेयक शुक्रवारी राज्यसभेत मांडले जाणार आहे. त्यानंतर या विधेयकावर चर्चा सुरु करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. मात्र लोकपाल विधेयक मंजूर होणार की पुन्हा रखडणार याचा निर्णय सोमवारी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अण्णा हजारे यांचे उपोषण सोमवारपर्यंत चालणार असे दिसते.

सिलेक्ट समितीने सुचवलेल्या १५ पैकी १३ बदलांसह हे विधेयक मांडले जाईल. पण समितीने सुचवलेल्या सर्व बदलांसह विधेयक मांडा, असा विरोधकांचा आग्रह आहे. याआधी लोकसभेत २७ डिसेंबर २०११ मध्ये लोकपाल विधेयक मंजूर झाले होते. त्यानंतर दोन दिवसांनी विधेयक राज्यसभेत मांडलं. पण विरोधांनी सुचवलेल्या बदलांनंतर अधिवेश स्थगित करण्यात आले होते.
दरम्यान, जनलोकपाल विधेयकासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे राळेगणसिद्धीमध्ये उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा शुक्रवारी चौथा दिवस आहे. मात्र लोकपाल विधेयक मंजूर होत नाही तोपर्यंत उपोषण सुरुच ठेवण्याचा अण्णांचा निर्धार आहे. त्याममुळे अण़््णा हजारे यांचे उपोषण सोमवारपर्यंत चालणार असे दिसते.