कसोटी मालिकेत चांगली कामगिरी करणार- धोनी

सेंच्युरियन – वनडे मालिकेत पराभव झाला असलातरी आगामी काळात होत असलेल्या कसोटी मालिकेत नंतर चांगली कामगिरी करण्याचा विश्वास टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने प्रसारमाध्यामांशी बोलताना व्यक्त‍ केला आहे. त्यामुळे आगामी काळात कसोटी मालिकेत टीम इंडियाची कामगिरी कशी राहणार याकडे लक्ष लागले आहे.

यावेळी बोलताना टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी म्हाणला ‘ कसोटीआधी वनडे मालिका पार पडली ते योग्यच झाले, यामुळे आम्हाला तेज व चेंडूला उसळी घेणा-या खेळपट्ट्यांची कल्पना आली. या अनुभवामुळे १८ डिसेंबरपासून रंगणा-या कसोटी मालिकेत आता आम्हाला दक्षिण आफ्रिकेच्या माऱ्याविरुद्ध संघर्ष करावा लागणार नाही ‘.

वनडे मालिकेतील तिसरा सामना पावसामुळे रद्द झाला. यातही द‌क्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची पिटाई करताना तीनशे प्लस धावा बोर्डावर लावल्याच. तिस-या वनडेत भारतीय गोलंदाजांनी द‌. आफ्रिकेच्या मधल्या फळीला चांगलेच सतावले होते. इशांत शर्माने केलेला प्रभावी मारा बघून भारतीय पाठिराख्यांसह धोनीलादेखील हायसे वाटले. इशांतने १० षटकांत ४० धावांत ४ विकेट्स खिशात टाकल्या. इशांतने गोलंदाजीच्या प्रशिक्षकांसह खूप मेहनत घेतली आहे. तसेच स्थानिक स्पर्धांमध्येही खेळल्याने इशांतच्या कामगिरीत सुधारणा दिसत असल्याचे यावेळी बोलताना धोनीने सागितले.

Leave a Comment