नवी दिल्ली – भारतीय लष्कराच्या पूर्व विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल दलबिरसिंग सुहाग यांना भारतीय पायदळाचे उपप्रमुख म्हणून नेमण्यात आले आहे. सध्याचे लष्कर प्रमुख जनरल विक्रमसिंग येत्या ऑगस्टमध्ये सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागी दलबिरसिंग हे लष्कर प्रमुख होतील. त्यांची आज उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आल्यामुळे तेच पुढचे लष्कर प्रमुख असतील हे निश्चित झाले आहे.
गतवर्षी सेवानिवृत्त झालेले लष्कर प्रमुख जनरल व्ही. के. सिंग यांनी दलबिरसिंग सुहाग आणि बिक्रमसिंग या दोघांनाही सूड भावनेने वागवल्याचे प्रकरण वादग्रस्त ठरले होते. आपल्या जागी या दोघांपैकी कोणी तरी एकजण लष्कर प्रमुख होणार हे त्यांना माहीत होते. परंतु वैयक्तिक द्वेषापोटी व्ही.के. सिंग यांनी दलबिरसिंग यांच्यावर कारवाई केली होती आणि त्यांची बढती रोखली होती.
जनरल व्ही.के. सिंग यांच्या जागी जनरल बिक्रमसिंग हे लष्कर प्रमुख होताच त्यांनी दलबिरसिंग यांच्या विरुद्धची कारवाई स्थगित केली. त्यामुळे दलबिरसिंगांच्या बढतीचा आणि लष्कर प्रमुख होण्याचा मार्ग मोकळा झाला.