ढाका – बांगला देशातील जमाते इस्लामी या जातीयवादी संघटनेचा ज्येष्ठ नेता अब्दुल कादर मुल्ला याला १९७१ सालच्या बांगला देश मुक्ती लढ्यात झालेल्या नरसंहाराबद्दल दोषी ठरवून काल फासावर लटकवण्यात आले. तिथे स्थापन करण्यात आलेल्या विशेष आंतरराष्ट्रीय न्यायालयाने अब्दुल कादर मुल्ला याला मुक्ती लढ्याच्या काळात पाकिस्तानी लष्कराशी हातमिळवणी करून अनेक महिलांवर अत्याचार करून त्यांना ठार मारल्याबद्दल दोषी ठरवले होते.
६५ वर्षे वयाच्या अब्दुल कादर मुल्ला याने मिरपूर भागामध्ये अनेक महिलांवर बलात्कार केले होते. त्याचबरोबर लहान मुले आणि महिला यांच्यासह अनेकांच्या हत्या केल्या होत्या. त्यामुळे त्याला या भागामध्ये बचर ऑफ मिरपूर म्हणजे मिरपूरचा खाटीक म्हटले जात होते. त्याचा अनेक लोकांच्या हत्यांमागे हात होता आणि तो अतिशय निर्दय म्हणून प्रसिद्ध होता.
त्याला मिरपूरच्या कारागृहामध्ये फासावर लटकवण्यात आले. त्याचा देह वीस मिनिटे फासावर लटकत होता. त्याचा प्राण गेला असल्याची खात्री पटल्यानंतरच त्याचा मृतदेह खाली काढण्यात आला. बांगला देशामध्ये १९७१ साली झालेल्या मुक्ती लढ्यातील हिंसाचारामागे हात असल्याबद्दल एकेका धार्मिक नेत्याला दोषी ठरवले जात आहे आणि एकापाठोपाठ एक त्यांना फाशीची शिक्षा दिली जाईल असे आता दिसत आहे. अब्दुल कादर मुल्ला याची फाशी या मालिकेतली पहिली फाशी आहे.