समलिंगी साठी वटहुकूम काढणार

नवी दिल्ली – समलिंगी संबंधाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाबद्दल सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त केली आहे आणि हा निर्णय निष्प्रभ करण्यासाठी कायद्यात बदल करण्याचा विचार सुरू केला आहे. असे संबंध बेकायदा ठरवणारे भारतीय दंडविधान संहितेचे कलम ३७७ रद्द करून त्या ठिकाणी नवे कलम आणण्याची तयारी केंद्र सरकारने सुरू केली आहे. त्यानुसार विधेयक आणले पाहिजे. परंतु त्याला विरोध होण्याची शक्यता असल्यामुळे वटहुकूम काढून हा बदल करण्याचा विचार सरकार करत आहे.

या निर्णयात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी एवढी रुची का दाखवली आहे यावर लोक तर्क लढवत आहेत. गेल्या काही दिवसांपासून कॉंग्रेसची आणि मध्यमवर्गीय मतदारांची फारकत झालेली आहे. केंद्र सरकारचे काही निर्णय मध्यमवर्गीय मतदारांना आवडलेले नाहीत. या मतदारांमध्ये मनमोहनसिंग यांची प्रतिमा चांगली होती. भ्रष्टाचारापासून दूर असणारे पंतप्रधान म्हणून मनमोहनसिंग या मतदारांत लोकप्रिय होते. परंतु त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे हा मतदारवर्ग त्यांच्यावर नाराज झाला आहे. त्याला पुन्हा आत्मसात करण्यासाठी काय करता येईल यावर कॉंग्रेसमध्ये विचार सुरू आहे.

गेल्या वर्षी गाजलेल्या दिल्लीतल्या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात सरकारने घेतलेली भूमिका मध्यमवर्गीयांना आवडणारी नव्हती. त्यामुळे हा वर्ग आपल्यावर नाराज झालेला आहे, असे सरकारला वाटते. त्या नाराजीची भरपाई करण्यासाठी समलिंगी संबंधाबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर काही तरी केले पाहिजे, अशी भावना सत्ताधारी पक्षात पसरली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे लक्षावधी लोक दुखावले आहेत. त्यामुळे सरकारने त्यांची दखल घेऊन ३७७ वे कलम बदलले नाही तर या जनतेची नाराजी सरकारसाठी त्रासदायक ठरेल असे विश्‍लेषण पक्षात सुरू आहे.

एरवी कोणत्याही घटनेवर शक्यतो प्रतिक्रिया न व्यक्त करणार्‍या आणि तशी व्यक्त केलीच तर उशीराने व्यक्त करणार्‍या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी या संबंधात मात्र ताबडतोबीने प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यामागे मध्यमवर्गीय मतदारांना आपलेसे करण्याची पक्षाची व्यूहरचना असल्याचे राजधानीत बोलले जात आहे.

Leave a Comment