मोदींच्या सभेला यायचेय ? फक्त मिसकॉल द्या

मुंबई – येत्या २२ डिसेंबरला बाँद्रा कुर्ला संकुलात होत असलेली भाजप पंतप्रधानपदाचे उमेदवार मोदी यांची सभा देशातील न भूतो न भविष्यति अशी भव्य राजकीय सभा व्हावी यासाठी भाजप राज्य शाखेने कंबर कसली आहे. मोदींच्या या सभेला किमान आठ लाख उपस्थिती असावी यासाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत असे समजते.

तुम्हाला मोदींच्या सभेला जायचे आहे मात्र घरापासून सभेचे ठिकाण फार दूर आहे अशी तक्रार करता येऊ नये यासाठी नवीनच क्लृप्ती लढविली गेली असून तुम्ही फक्त दिलेल्या नंबरवर मिसकॉल केलात तर तुमच्या घरापासून जवळ असलेल्या ठिकाणाहून सभेच्या जागी नेण्यासाठी पक्ष व्यवस्था करणार आहे असे  शहर प्रवक्ते निरंजन शेट्टी यांनी सांगितले. याशिवाय ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठीही खास प्रयत्न सुरू असून किमान २ लाख लोकांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे यासाठी विशेष मेहनत घेतली जात आहे.

मोदींच्या हैद्राबाद आणि कर्नाटकातील सभेसाठी अनुक्रमे सव्वा लाख आणि दीड लाख लोकांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले होते. मुंबईतील सभेत हा आकडा पार केला जावा असा प्रयत्न सुरू आहे. राज्यभरातून सभेसाठी येऊ इच्छीणार्‍यांसाठी रेल्वे, बस व खासगी गाड्या बुक केल्या गेल्या आहेत शिवाय मुंबईतील १० हजार चहावालेही या सभेला येणार आहेत. कार्यकर्त्यांच्या जेवणाखाणाची व्यवस्था धार्मिक संस्थांकडे सोपविण्यात आली आहे असेही समजते.

Leave a Comment