उत्तराखंडमध्ये २२ डिसेंबरला अॅडव्हेंचर कार रॅली

जून जुलैमध्ये प्रलयंकारी पावसामुळे प्रचंड नुकसान झालेल्या उत्तराखंड राज्याने पुन्हा उभारी घेतली असून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी तेवीस वर्षांनंतर प्रथमच साहसी क्रीडा प्रकार असलेल्या उत्तराखंड अॅडव्हेंचर कार रॅलीचे आयोजन केले आहे. अनेक प्रेक्षणीय स्थळांच्या मार्गावरून ही रॅली जाणार आहे. देशभरातून ७० स्पर्धकांनी या रॅलीसाठी नांव नोंदणी केली आहे. निसर्गरम्य अशा ठिकाणातून सुमारे १००० किमीचा प्रवास ही रॅली करणार आहे.

या रॅलीचा मूळ उद्देशच देशात तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्तराखंड पुन्हा पूर्वपदावर आले असल्याचा मेसेज देणे हा आहे. येथील रस्ते चांगले केले गेले आहेत आणि सुटीची मजा लुटण्यासाठी येथे येणार्‍या पर्यटकांना निसर्गाचा मनमुराद आनंद लुटता येणार आहे असा संदेश या रॅलीतून दिला गेला आहे. या स्पर्धेत ३५ टीम सहभागी झाल्या असून प्रत्येक कार मध्ये चालक व नेव्हीगेटर अशी दोघांना बसण्याची परवानगी आहे.

डेहराडून येथून २२ डिसेंबरला ही रॅली सुरू होत असून पहिल्या दिवशी ती देवप्रयाग, कर्णप्रयाग, रूद्रप्रयाग, नंद प्रयाग या मार्गाने औलीला जाणार आहे. दुसर्‍या दिवशी औलीहून रामनगर जिम कार्बेट उद्यान येथे जाणार असून तिसर्‍या दिवशी पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेल्या मसुरीतील लाल बहादूर शास्त्री नॅशनल अॅकॅडमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन येथे ती समाप्त होणार आहे. हिमालयन मोटस स्पोर्टस तर्फे या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.