दिल्लीत पुन्हा सामूहिक बलात्कार

नवी दिल्ली – दिल्लीचा उच्चभ्रु व मध्यवर्ती भाग असलेल्या कॅनॉट प्लेस भागामध्ये एका अल्पवयीन मुलीवर चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचे वृत्त आज (बुधवार) सूत्रांनी दिले. पीडित मुलगी ही मूळची उत्तर प्रदेशमधील असून आपल्या सावत्र आईशी भांडण झाल्यामुळे ती घरातून पळून आली होती. नवी दिल्ली येथील मेट्रो स्थानकाबाहेर येत असताना तिला चार जणांनी येथील सिंदीया हाऊसमागील वाहनतळामध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. या ठिकाणी गस्त घालत असलेल्या पोलिसांच्या पथकास ही मुलगी रडताना आढळल्याचे सूत्रांनी सांगितले. पोलिसांनी तिला नजीकच्या राम मनोहर रुणालयामध्ये तपासणीसाठी दाखल केले. तेथे तपासणीनंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले. या मुलीस जबर मानसिक धक्का बसला असून सध्या तिला सरकारकडून चालविण्यात येणार्‍या नारी निकेतन संस्थेमध्ये दाखल करण्यात आले आहे.

सध्या तिची कोणताही संवाद साधण्याची मानसिक स्थिती नाही. स्वयंसेवी संस्थामधील काही सभासद तिची समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहेत,’’ असे पोलिसांनी सांगितले. यासंदर्भात आरोपींचा शोध घेण्यात असून बाराखंबा पोलिस स्थानकामध्ये सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.