तुळजापूरजवळ सहलीच्या बसला अपघात, 8 मृत्यूमुखी

सोलापूर – सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर तुळजापूर तालुक्यात माळुंब्रा गावात शाळेच्या सहलीच्या बसला अपघात झाला. या अपघातात सात विद्यार्थ्यांसह बस चालकाचा मृत्यू झाला आहे. एका खासगी बसने शाळेच्या बसला समोरुन दिलेल्या धडकेत आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात सात जण जखमी झाले असून तिघांची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींना अश्विनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. कोल्हापूरच्या सांगवडे माध्यमिक शाळेच्या सहलीची ही बस आहे. ही बस काल रात्री कोल्हापूरहून तुळजाभवानीच्या दर्शनासाठी निघाली होती. रात्री एका ठिकाणी थांबली असता दुसर्‍या एका खाजगी बसने धडक दिली. तुळजापूरपासून 15 किमी अंतरावर नागोबा देवस्थानाजवळ एक शार्प टर्न आहे. हा टर्नच अपघाताला कारणीभूत ठरला. खासगी बसच्या चालकाला वेग नियंत्रित करता आला नाही आणि बस शाळेच्या बसला धडकली.

मृतांमध्ये अक्षय पाटील, वल्लभ कंभे, गणेश कुंभार, आकाश शिर्के, सुरज पाटील, पंकज कुंभार आणि दर्शन लोखंडे या सोळा वर्षांच्या सात मुलांचा आणि प्रताप सुर्वे या बस चालकाचा समावेश आहे. तर जखमींची आकाश जाधव, अजय मोहिते, ऋषिकेश बभान, दिशांत जाधव, सौरभ सरगौंडा, प्रदीप देसाई, शैलेष जिरगे, रोशन बिरांजे, प्रकाश नेमगौंड पाटील अशी नावे आहे.