कोलकत्ता – न्यायमूर्ती ए. के. गांगुली यांच्या गैरवर्तनाची चौकशी करणार्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या त्रिसदस्यीय समितीने गांगुुली यांनी त्या पीडित महिला वकिलाशी केलेले वर्तन हे लैंगिक गैरवर्तन या सदरात मोडणारे असल्याचे म्हटले आहे. आपल्या समितीने उपलब्ध पुरावे आणि पीडित महिलेची जबानी यावरून असा निष्कर्ष काढला असल्याचे समितीच्या सदस्यांनी सांगितले.
२४ डिसेंबर २०१२ या दिवशी हा प्रकार घडला. त्या दिवशी न्या. गांगुली हे दिल्लीच्या ला मेरिडियन या हॉटेलमध्ये मुक्कामाला होते आणि पीडित वकील महिला ही त्यांना मदत करण्यासाठी तिथे गेलेली होती. तिथे न्या. गांगुली यांनी रात्री आठ ते साडे दहा या वेळात या महिलेशी जो संवाद साधला त्यामध्ये काही आक्षेपार्ह शब्द होते, त्याच बरोबर अश्लील हालचाली सुद्धा होत्या अशा निष्कर्षाप्रत ही समिती आली असल्याचे या सदस्याने सांगितले.
या चौकशी समितीमध्ये न्या. आर.एम. लोढा, न्या. एच.एल. दत्तू आणि न्या. रंजना प्रकाश देसाई या तिघांचा समावेश होता. या पीडित महिलेने दाखल केलेल्या तक्रारीत न्यायमूर्तींचे नाव दिलेले नाही. परंतु तिने केलेले काम आणि नोंदलेली तारीख यावरून ही समिती या निष्कर्षाप्रत आली आहे असे समितीच्या एका सदस्याने सांगितले.