टीम इंडियाची आजपासून आफ्रिकेत परीक्षा

जोहान्सबर्ग- जोहान्सबर्गमधील न्यू वाँडर्स स्टेडियमवर टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन लढतींच्या वनडे मालिकेला आजपासून (५ डिसेंबर) सुरुवात होत आहे. गेल्या. काही दिवसांपासून टीम इंडियाची बहरलेली फलंदाजी आणि दक्षिण आफ्रिकेचा मजबूत तेज मारा यांची कस लागणार आहे.

जागतीक क्रमवारतील अव्वल स्थान अबाधित राखताना सलग पाच मालिका जिंकलेल्या ढोणी आणि सहका-यांचा आत्मविश्वास उंचावला आहे. मात्र सातत्य राखण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. भारताने जूननंतर जिंकलेल्या पाच वनडे जेतेपदांपैकी तीन परदेशातील आहे. मात्र द्विपक्षीय मालिकेत भारताला दक्षिण आफ्रिकेत मालिका जिंकता आलेली नाही.

कॅलेंडर वर्षात एक हजारहून अधिक धावा करणा-या विराट कोहली, रोहित शर्मा आणि शिखर धवन या आघाडीच्या ‘त्रिकुटा’वर पाहुण्यांची फलंदाजीची भिस्त आहे. मात्र मधल्या फळीची चिंता कायम आहे. अनुभवी सुरेश रैना आणि अष्टपैलू युवराजला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. आघाडीच्या फळीसह कर्णधार महेंद्रसिंग ढोणीच्या बहादार कामगिरीमुळेच या दोघांची खराब कामगिरी झाकली गेली आहे.

गोलंदाजीची मदार इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव आणि मोहम्मद शामीवर आहे. भारताची मध्यमगती तसेच ऑफस्पिनर आर. अश्विन, अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि अमित मिश्रावर फिरकी मा-याची धुरा आहे. घरच्या मैदानावर प्रथमच पाकिस्तानविरुद्ध मार खावा लागला तरी अपयश विसरून कामगिरी उंचावण्यासाठी एबी डेविलियर्स आणि सहकारी उत्सुक आहेत. भारताविरुद्ध यजमानांनी तुल्यबळ संघ उतरवला आहे. मात्र तेज आक्रमण हे त्यांचे प्रमुख अस्त्र असेल. अनुभवी डेल स्टेन, मॉर्नी मॉर्केल, व्हर्नन फिलँडर आणि ज्याक कॅलिससह दक्षिण आफ्रिका खेळेल.