मुंबई – या वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यात महाराष्ट्राची राजधानी मुंबईत बलात्काराच्या २२९ तर सामुहिक बलात्काराच्या ८ घटना पोलिस दफ्तरी नोंद झाल्या असल्याचे माहिती हकक अधिकार कायद्यानुसार मिळविलेल्या माहितीतून समोर आले आहे. पोलिस नोंद न झालेल्या घटनांची संख्या आणखी मोठी असावी असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे बहुतेक घटनांमध्ये बलात्कारित महिला आरोपींना ओळखत होत्या असेही समोर आले असून त्यातील कांही प्रियकर होते, कांही मित्र होते तर कांही शेजारी होते.
सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती हक्क कायद्याखाली अर्ज करून या संबंधीची माहिती मागितली होती. त्यानुसार ऑगस्ट २०१३ पर्यंतच २२९ बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. सामुहिक बलात्कारात देशात खळबळ माजविणार्या शक्ती मिल बलात्काराच्या दोन घटनांचाही समावेश आहे. गलगली यांच्या मते वर्षअखेर या घटनांत आणखी भर पडणार आहे कारण नोव्हेंबरमध्येच दिंडोशी आणि बोरिवलीत अज्ञान बालिकांवर सामुहिक बलात्कार झाल्याच्या दोन घटना घडलेल्या आहेत.
गेल्या वर्षात मुंबईत बलात्काराच्या २२३ व सामुहिक बलात्काराच्या ८ घटना घडल्या होत्या. याचाच अर्थ या वर्षात या प्रकारच्या गुन्ह्यांची संख्या वाढली आहे.