चीनच्या अंतरीक्ष यानाचे अवशेष पडल्याने दोन घरांचे नुकसान

बीजिंग – चीनने चंद्रावर ज्या यानातून आपला उपग्रह सोडला होता त्या यानाचे अवशेष पृथ्वीवर पडल्याने दोन घरांचे नुकसान झाले आहे. हे अवशेष चीनमध्येच लाँचिंग पॅडपासून सुमारे एक हजार किमी अंतरावर पडले. त्यात या दोन घरांचे नुकसान झाले. मध्य हुनान प्रांतातील सुईनिंग प्रदेशातील एका गावातील दोन घरांवर हे अवशेष पडले. मात्र, त्यात कोणीहंी जखमी झाले नाही.

ज्या घरांचे यात नुकसान झाले आहे त्यांना त्यासाठी भरपाईही दिली जाणार आहे. हे अवशेष ज्या भागात पडण्याची शक्यता होती त्या परिसरातील अकरा ठिकाणच्या लोकांना आधीच अन्यत्र हलवण्यात आले होते. त्यामुळे जीवितहानी झाली नाही. यासाठी सुमारे एक लाख 60 हजार लोकांचा तात्पुरते स्थलांतर करावे लागले असल्याची माहिती चिनी सूत्रांनी दिली. 1992 पासून सुमारे 30 वेळा या परिसरातील लोकांचे अशा प्रकारच्या प्रक्षेपणांमुळे तात्पुरते स्थलांतर करावे लागले आहे. दरम्यान, चीनने चंद्रावर सोडलेल्या या उपग्रहाची वाटचाल सुरळीतपणे सुरू असल्याची माहिती चिनी अंतरिक्ष केंद्रांच्या सूत्रांनी दिली.