इस्लामाबाद – हत्या करण्यात आलेले बलुची नेते अकबर खान बुग्ती यांच्या हत्येला पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेज मुशर्रफ हेच जबाबदार असून त्यांना ठार मारण्यासाठी बुग्ती यांच्या मुलाने त्यांच्यावर जे बक्षीस लावले आहे. त्यात त्यांनी आता दुपटीने वाढ केली आहे. जो कोणी मुशर्रफ यांना ठार मारील त्याला दोन अब्ज रुपये आणि दोनशे एकर शेतजमीन दिली जाईल, अशी घोषणा बुग्ती यांचे चिरंजीव तलाल अकबर बुग्ती यांनी केली आहे.
तलाल बुग्ती हे अकबर बुग्ती यांचे चौथ्या क्रमांकाचे चिरंजीव आहेत. जनरल परवेझ मुशर्रफ हे अध्यक्ष असतानाच्या काळात अकबर बुग्ती यांची लष्करी कारवाईत हत्या करण्यात आली होती. यापूर्वी तलाल यांनी मुशर्रफ यांना ठार मारणार्यासाठी एक अब्ज रुपये आणि शंभर एकर जमिनीचे बक्षीस लावले होते. काल रावळपिंडीत पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या एका नेत्याच्या घरात तलाल बुग्ती यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि मुशर्रफ यांच्या मारेकर्यासाठी ठेवलेले बक्षीस दुप्पट केले असल्याची घोषणा केली.
स्वतः मुशर्रफ यांच्यावर पाकिस्तान सरकारने बुग्ती यांच्या हत्या प्रकरणावरून खटला दाखल केला आहे. मुशर्रफ यांनी लष्करप्रमुख म्हणून आणि नंतर देशाचे अध्यक्ष म्हणून अनेक गंभीर स्वरूपाच्या चुका केल्या असून त्यांनी पाकिस्तान उद्ध्वस्त करून टाकला आहे, असा आरोप तलाल बुग्ती यांनी या पत्रकार परिषदेत केला. मुशर्रफ यांनी समाजाच्या विरोधात अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले असल्याचा आरोपहंी त्यांनी केला. लाल मशिदीवर तसेच बलुचिस्तानवर करण्यात आलेली लष्करी कारवाई हा त्यांनी केलेला मानवतेविरुद्धचाच गुन्हा आहे असे त्यांनी म्हटले आहे.