मंगळ यान पोहोचले 9.25 लाख किमी उंचीवर

बंगळूर – भारताने मंगळ ग्रहाच्या दिशेने सोडलेल्या मंगळयानाचा पुढील प्रवास सध्या सुरळीत सुरू असून या यानाने आता पृथ्वीची प्रभाव असलेले क्षेत्रही ओलांडले आहे. ते आता 9.25 लाख किमी उंचीवर पोहोचले आहे, अशी माहिती इस्रोच्या वतीने आज देण्यात आली. आज मध्यरात्री 1 वाजून 14 मिनिटांनी या यानाने पृथ्वीचे प्रभाव क्षेत्र ओलांडून पुढील प्रवासासाठी झेप घेतली.

हे यान पृथ्वीपासून 680 दशलक्ष किमी अंतरावर असलेल्या मंगळाच्या कक्षेत एप्रिल 2014 मध्ये पोहोचेल अशी अपेक्षा आहे. या प्रवासाच्या काळात यानाची दिशा बदलली तर त्यात योग्य त्या दुरुस्त्या चार टप्प्यात केल्या जाणार आहेत. यातील पहिली दुरुस्ती 11 डिसेंबरला, दुसरी एप्रिलमध्ये आणि तिसरी ऑगस्टमध्ये व आवश्यकतेनुसार चौथी दुरुस्ती सप्टेंबर 2014 मध्ये केली जाणार आहे. यानाच्या प्रवासावर बंगळूर येथील नियंत्रण कक्षातून लक्ष ठेवले जात असून बेलालू येथील डीप स्पेस नेटवर्क अ‍ॅटेनातून त्याला योग्य ती दिशा दिली जात आहे.

Leave a Comment