वॉशिग्टन – अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला काय कमी असे कुणाला वाटत असेल तर त्यांनी ही बातमी आवर्जून वाचावी. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा इच्छा असूनही अॅपलचा आयफोन वापरू शकत नाहीत. हे ओबामांनी स्वतःच व्हाईट हाऊसमध्ये त्यांच्या हेल्थ केअर लॉ प्रमोशनसाठी जमलेल्या तरूणांना सांगितले आहे.
अर्थात आयफोन वापरणे ओबामांना परवडत नसावे असा अर्थ कोणी काढू नये. ओबामा म्हणतात की सुरक्षेच्या कारणास्तव मला आयफोन वापरणे शक्य होत नाही. माझ्या मुली मलिया आणि साशा मात्र दिवसातला बराच वेळ आयफोनवर घालवितात. ओबामा वापरत असलेला ब्लॅकबेरी सिक्युरिटी इन्स्क्रीप्शन साठी नावाजलेला असल्यामुळे वॉशिग्टनमध्ये कार्यालयीन कामकाजासाठी हाच फोन लोकप्रिय आहे. ब्लॅकबेरीचे मार्केट घसरले असले तरी अमेरिकन इंटेलिजन्सचा अजूनही ब्लॅकबेरी वापरण्यात असलेल्या सुरक्षितपणावर गाढ वि्श्वास आहे.
अमेरिकन गुप्तचर संस्थांतर्फे देशोदेशीच्या प्रमुखांच्या फोन संभाषणांवर नजर ठेवली जात असल्याचे उघडकीस आल्यापासून तर ओबामा यांच्या वैयक्तीक फोनबाबत अधिकच काळजी घेतली जात असून त्यांचा पर्सनल इमेलही फारच थोड्या वरीष्ठ अधिकारी आणि कांही जवळच्या मित्रांपुरताच मर्यादित ठेवला गेला आहे. ओबामा सांगतात व्हाईट हाऊसमध्ये राहताना सर्वसामान्यांत मनमोकळेपणाने मिसळता येत नाही आणि बाहेरच्या बातम्या चेक झाल्याशिवाय माझ्यापर्यंत पोहोचत नाहीत या गोष्टी मिस करतो.