नारायण साईला बेड्या पडल्या

नवी दिल्ली – सुरत येथील बलात्कार प्रकरणी आणि अनेक लैगिक शोषण गुन्ह्यांप्रकरणी पोलिसांना हवा असलेला नारायण साई याला पंजाब दिल्ली सीमेवर पोलिसांनी अखेर अटक केली असून त्याला दिल्लीत आणले गेले आहे. गेले दोन महिने पोलिसांना चकमा देणार्‍या नारायणसाईला शीख वेषांत पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांनी बेड्या ठोकल्या. स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू आसारामबापू यांचा नारायण मुलगा असून आसारामना या पूर्वीच लैंगिक शोषण प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

एका तीस वर्षीय महिलेचे २००१ ते २००५ या काळात लैगिक शोषण केल्याप्रकरणी नारायणसाई विरोधात ६ आक्टोबरला तक्रार दिली गेली होती.त्यानंतर ७ अक्टोबरला पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला मात्र तेव्हापासून तब्बल दोन महिने तो पोलिसांना चकमा देत होता. नारायण साईला देश सोडून जाण्यास बंदी करण्यात आली होती. सुरत येथील दोन बहिणींनीही त्याच्याविरोधात बलात्काराचा आरोप केल्यानंतर गुजराथ पोलिसही त्याला देशभर शोधत होते. अनेक राज्यात दिल्ली व गुजराथ पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी छापे घातले होते मात्र त्यांना यश मिळत नव्हते. अखेर आज कुरूक्षेत्रजवळ पिपली येथे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याला मदत करणार्‍या अन्य चौघाजणांनाही अटक करण्यात आली आहे.

नारायणसाईची चौकशी दिल्लीतच केली जाणार आहे असेही समजते.

Leave a Comment