कॉमेट आयसॉन सूर्याबरोबरची लढाई हरला

नवी दिल्ली – या शतकातील सर्वात तेजस्वी आणि आकाराने मोठा असा धुमकेतू आयसॉन डिसेंबरमध्ये आकाश उजळून टाकेल अशी अपेक्षा केली जात असतानाच हा धुमकेतू सूर्याजवळ गेल्यानंतर फुटला असल्याचे नासातील वैज्ञानिकांनी जाहीर केले आहे.

याविषयी मिळालेल्या माहितीनुसार नासातील खगोलतज्ञ आयसॉनच्या प्रवासावर अगदी बारीक नजर ठेवून होते. तो सूर्याच्या जवळून केवळ ७,३०,००० मैलांवरून २८ नोव्हेंबरला जाणार होता. सर्वसाधारणपणे असे मोठे धुमकेतू सूर्याजवळून जाताना भंगतात. मात्र आयसॉन त्याला अपवाद ठरेल असा शास्त्रज्ञांना अंदाज होता. मात्र सूर्याजवळून प्रवास करून तो यशस्वीरित्या बाहेर येऊ शकलेला नाही असे आता स्पष्ट झाले आहे. त्याचा केंद्रभाग फुटला असल्याचे नासाने जाहीर केले आहे.सध्या हा धुमकेतू दिसतोय पण तो अतिशय मंद दिसतो आहे याचाच अर्थ तो फुटला आहे असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

रशियातील दोन हौशी आकाश निरीक्षकांनी सप्टेंबर २०१२ मध्ये हा धुमकेतू शोधला होता. प्रंचड मोठ्या आकाराचा, अतिशय तेजस्वी आणि खूप वेगाने प्रवास करणार्‍या या धुमकेतूवर जगभरातील खगोलतज्ञ नजर ठेवून होते. त्याची अनेक सुंदर छायाचित्रेही प्रकाशित करण्यात आली होती.

Leave a Comment