देशभरात वावरताहेत नारायणसाईचे अनेक डुप्लिकेट

मुंबई – सुरत रेप प्रकरणात गुजराथ पोलिसांना हवा असलेला नारायण साई अद्यापी पोलिसांना गुंगारा देत आहे. अशा परिस्थितीत नवीनच माहिती समोर येत असून त्यानुसार नारायण साईने त्याच्या सारख्या दिसणार्‍या लोकांची एक टीमच तयार केली आहे. देशभरात विविध जागी हे डुप्लिकेट आलिशान मोटारीतून नारायणसाईच्या हुकुमाप्रमाणे फिरतात व लोकांच्या नजरेत भरताच ताबडतोब लपतात. परिणामी लोकांकडून नारायणसाईला पहिल्याच्या खबरा पोलिसांपर्यंत आल्या की पोलिस या डुप्लिकेट साईच्या मागे लागतात. कधी तो सापडतो, कधी सापडत नाही. समजा सापडलाच तर आपली खरी ओळख पटवून तो पोलिसांच्या तावडीतून सुटतो. मात्र तोपर्यतं खरा नारायणसाई पोलिसांच्या नजरेपासून दूरच राहतो असे सांगितले जात आहे.

गेल्या कांही दिवसांत देशाच्या विविध भागातून नारायणसाईला पाहिल्याचे अनेकांनी पोलिसांना सागितले आहे. मध्यप्रदेशात एकाचवेळी नारायण साईला विविध ठिकाणी पाहिल्याची खबर पोलिसांना मिळाली होतीच. आता बिहारमधील भागलपूर, छत्तीसगढ, जयपूर, वृंदावन, अलिगढ अशा अनेक ठिकाणांहून नारायणसाईला पहिल्याची खबर पोलिसांना दिली जात आहे. परिणामी पोलिसांना प्रत्येक खबरीची शहानिशा केल्याशिवाय पुढचा तपास करणेच अशक्य बनले आहे असेही समजते.

गुजराथ पोलिसांबरोबरच अनेक राज्यांच्या पोलिसांना नारायण साई हवा आहे मात्र अद्यापपर्यंत तरी खरा नारायण साई पोलिसांना गवसलेला नाही. नारायणसाईचे अनेक भक्तही लपण्यासाठी नारायणसाईला मदत करत असावेत असाही पोलिसांचा अंदाज आहे.

Leave a Comment