वेबसाईटवरील ओळखीतून महिलेवर बलात्कार

मुंबई – विवाहविषयक वेबसाईटद्वारे झालेल्या ओळखीतून महिलेवर बलात्कार करून तिची अश्लील चित्रफीत तयार केल्याप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी गुरुवारी २७ वर्षीय तरुणाला अटक केली. या चित्रफीतीद्वारे आरोपी महिलेला धमकावत असल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे.पीडित ३१ वर्षीय महिला करीरोड परिसरातील रहिवासी असून, ती वरळीतील एका खासगी कंपनीत अधिकारी म्हणून कार्यरत आहे.

गेल्यावर्षी तिच्या कुटुंबीयांनी तिला दुस-या लग्नाचा सल्ला दिला. त्या वेळी तिने विवाहविषयक एका वेबसाईटद्वारे स्वत:चे प्रोफाइल तयार केले. त्या वेळी पुण्यातील जुनी सांगवी परिसरात राहणा-या योगेश बळराम आंग्रे (२७) या तरुणाने तिला १० ऑगस्ट २०१३मध्ये लग्नाची मागणी घातली. पीडित महिलेने त्याला सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर दोघेही फेसबुकवरून एकमेकांच्या संपर्कात होते. ८ सप्टेंबर रोजी योगेश आंग्रे याने त्या महिलेला दादर स्थानकात भेटायला बोलावले. त्या वेळी मुलीसोबत प्रथम योगेशला भेटल्यानंतर दोघांनीही एकमेकांना पसंत केले.

त्यानंतर शिवाजी पार्कपरिसरात फेरफटका मारल्यानंतर महिलेने मुलीला घरी सोडले. त्यानंतर योगेशने महिलेला लॉजवर जाऊया का असे विचारले. त्या वेळी तिने नकार दिला. मात्र आपण लग्न करणार असल्याचे सांगून योगेशने त्या महिलेवर दादर येथील रॉयल लॉजवर तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी भेटायला बोलवल्याचे सांगून योगेशने त्या महिलेला पुण्यात बोलावले. त्या वेळी घरी कोणी नसल्याचा फायदा घेत योगेशने पुन्हा तिच्यासोबत शरीरिक संबंध ठेवले आणि तिच्या नकळत तिची अश्लील चित्रफीत तयार केली. ही चित्रफीत पीडित महिलेला दाखवल्यानंतर तिने ती डिलीट करण्याची विनंती केली असता आपण लग्न करणार आहोत, असे सांगून योगेशने वेळ मारून नेली.

सर्व काही सुरळीत सुरू असताना १२ ऑक्टोबर रोजी योगेशने माझ्या घरातले तुझ्या मुलीला स्वीकारणार नाहीत, त्यामुळे तू मुलीला सोडून दे, असे सांगितले. त्याला पीडित महिलेने नकार दिला. त्यानंतर २० ऑक्टोबरला योगेशने पीडित महिलेला धमकावले. माझा पाठलाग करू नकोस अन्यथा तुझी अश्लील चित्रफीत संकेतस्थळावर अपलोड करीन, अशी धमकी त्याने दिली. त्यामुळे पीडित महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार केली.

Leave a Comment