नवी दिल्ली – कार्यालयातील एका सहकारी महिलेने लैंगिक छळाचा आरोप केल्याच्या कारणावरून तहलका’चा संपादक तरुण तेजपाल यांना अटक करण्यासाठी गोवा पोलीस शुक्रवारी सकाळी नवी दिल्लीतील घरी पोहोचले. मात्र, त्या ठिकाणी तेजपाल नसल्याने पोलिसांना चकवा दिल्याचे स्पष्ट झाले आहे. अटकेपूर्वीच तरुण तेजपाल हा फरार झाला असून पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत.
लैंगिक शोषणप्रकरणी तेजपाल यांना शुक्रवारी कोणत्याही क्षणी अटक होणार अशी शक्यता होती. गोवा पोलिसांनी गुरुवारीच तेजपाल यांची दोन दिवसांच्या मुदतीची मागणी फेटाळली होती. त्यानंतर आज अटक करण्यासाठी गोवा पोलीस दिल्लीत गेलेत. मात्र, तेजपाल घरी नसल्याने अटक टळली आहे.
दरम्यान, याप्रकरणी तरुण तेजपालने संबंधित मुलीला ई-मेल पाठवून माफी मागून समजावण्याचा प्रयत्नही केला. तेव्हा या मुलीनं त्याला जशास तसं उत्तर ई-मेलद्वारेच दिलं. आणि हे दोन्हीही ई-मेल आता ‘लीक’ झालेत. या मेलमध्ये ही दोघंही त्या घटनेबद्दलच बोलत आहेत. एका बलॉगवर या दोघांचं हे ई-मेल संभाषण जाहीर करण्यात आले आहे. हा ई-मेल तरुण तेजपालने पीडित पत्रकार तरुणीला १९ नोव्हेंबर रोजी पाठवला होता.