कर्नाटक विधानसभेत येडीयुरप्पांचे धरणे

बेळगाव – कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडीयुरप्पा यांनी विधानसभेतच बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. मंगळवारी दुपारी सुरू केलेले हे धरणे त्यांनी रात्रभर चालू ठेवले होते. कर्नाटकातल्या कॉंग्रेस सरकारने गरीब मुस्लीम कुटुंबातील मुलींच्या विवाहासाठी ५० हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली आहे. ही सवलत केवळ मुस्लिमांना लागू न होता समाजातल्या सर्व जातीधर्मातल्या गरीब कुटुंबांना लागू करावी, अशी त्यांची मागणी आहे.

या मागणीसाठी येडीयुरप्पा यांनी विधानसभेतच्या वेलमध्येच धरणे धरले असून सरकारची ही शादी भाग्य योजना सर्व समाज घटकांना लागू करण्याची घोषणा होईपर्यंत हे धरणे सुरू राहील, असे म्हटले आहे. मंगळवारी दुपारी कामकाज सुरू होताच त्यांनी धरणे सुरू केले. कामकाज होत राहिले आणि माजी मुख्यमंत्री वेलमध्येच बसून राहिले.

या मागणीसाठी त्यांनी कर्नाटक विधानसभेच्या यापूर्वीच्या अधिवेशनात बंगळूर येथे २६ दिवसांचे धरणे धरले होते. बेळगाव येथे हिवाळी अधिवेशन सुरू होताच त्यांनी आपले बंगळूरमधले धरणे बेळगावमध्ये मागील पानावरून पुढे सुरू ठेवले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या येडीयुरप्पा यांच्या सूचनेचा विचार करण्याचे आश्‍वासन दिले आणि येडीयुरप्पा यांनी आपले धरणे सोडावे, असे आवाहन त्यांना केले. मुख्यमंत्री अशारितीने धरणे धरून बसत असतील तर सभागृहाची प्रतिष्ठा बाधीत होते, असे मुख्यमंत्री म्हणाले.

येडीयुरप्पा यांनी आपण मुस्लिमांच्या विरोधात नाही, असा खुलासा केला. शादी भाग्य योजना मुस्लिमांना लागू रहावीच, त्यांची ती योजना रद्द न करता तिची व्याप्ती वाढवावी अशी आपली मागणी असल्याचे ते म्हणाले.