नवी दिल्ली – गोव्यातल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी पत्रकार तरुण तेजपाल यांना गोवा पोलिसांनी इमिग्रेशन चेकपोस्ट अलर्ट नोटीस बजावली असून देश सोडून जाण्यास प्रतिबंध केला आहे. त्यांनी देश सोडून जाण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना अटकाव करावा, अशा सूचना सर्व विमानतळांना सुद्धा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, तरुण तेजपाल यांनी नवा पवित्रा घेतला असून आपल्यावर केला गेलेला आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले आहे. आपण त्या तरुणीशी जे बोललो तो एक सहज संवाद होता. त्या संवादानंतर सदर तरुणी शांत होती. रात्रभर आणि नंतरचा दिवस तिचा व्यवहार सामान्य होता. मात्र नंतर तिला भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी प्रेरित केले आणि आपल्याविरुद्ध तक्रार द्यायला लावली, असे तेजपाल यांनी म्हटले आहे.
दरम्यान, गोवा पोलिसांनी त्या पीडित तरुणीचा जबाब नोंदला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने तेजपाल यांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज नामंजूर केला असून त्यांच्या अर्जाची पुढील सुनावणी लांबणीवर टाकली आहे.