केजरीवाल यांचे नाव दोन मतदारयाद्यांत: चौकशी सुरू

नवी दिल्ली -आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल यांचे नाव दोन मतदारयाद्यांमध्ये असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यावरून निवडणूक आयोगाने चौकशी सुरू केली आहे.दिल्लीत सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. अशातच दिल्लीतील दोन मतदारसंघांच्या मतदारयाद्यांमध्ये केजरीवाल यांचे नाव असल्याचा दावा करण्यात आला आहे.

यासंबंधी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या बातम्यांची दखल घेत आयोगाने निवडणूक अधिकार्‍यांना दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे. हा अहवाल आल्यानंतरच पुढील पावलाबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले. दिल्ली भाजपने काही दिवसांपूर्वीच केजरीवाल यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती.

दिल्लतील दोन आणि उत्तर प्रदेशातील एक अशा तीन मतदारसंघांच्या मतदारयाद्यांमध्ये केजरीवाल यांचे नाव असल्याचा आरोप भाजपने केला होता. दरम्यान, केजरीवाल यांचा पत्ता बदलल्याची माहिती आयोगाला याआधीच देण्यात आली होती. आता या मुद्द्यावर आयोगानेच पुढील कार्यवाही करायची आहे, अशी प्रतिक्रिया आपने दिली आहे.