अ‍ॅक्शन ओके… पण कथा…?

‘गदर : एक प्रेम कहानी’ दिग्दर्शक अनिल शर्मा आणि सनी देओलचा हिट चित्रपट. त्यामुळे जेव्हा ‘सिंग साहब द ग्रेट’द्वारे ही जोडी परत एकत्र दिसते तेव्हा साहजिकच अपेक्षा वाढते. पण ती पूर्ण मात्र होत नाही हे दुर्दैव.

सरबजित सिंग (सनी देओल) पंजाबमधील जिल्हाधिकारी आहे. त्याची पत्नी मिनी (नवोदित उर्वशी राऊते) आणि बहिण (अंजली एबरोल) असा त्याचा परिवार. जिल्हाधिकारी म्हटल्यावर त्याचा संघर्ष भूमिकेचा ठरलेलाच. इथंही तसेच होते. भूदेव (प्रकाश राज) हा वाळू माफिया आहे. ज्याच्याशी सरबजितचा संघर्ष सुरू होतो आणि त्यात त्याला आपल्या पत्नीला गमवावे लागते. त्यात भूदेव अशी खेळी खेळतो की सरबजितला तुरुंगाची हवाही खावी लागते. आणि….
तेथून बाहेर आल्यावर तो सिंह साहब नावाने भूदेवशी संघर्ष सुरू करतो. ज्यात त्याला दूरदर्शन पत्रकार शिखाची (अमृता राव) मदत मिळते. मग… पुढे जे घडते ते मात्र रजतपडद्यावर पाहण्यासारखे.

दिग्दर्शक अनिल शर्मांनी बर्‍याच काळाने परत मोठ्या पडद्यावर सनी पाजीला आणणे, त्याच्या ‘ढाई किलो का हाथ’चा वापर करणे नक्कीच चांगले. पण जोडीला कथेकडेही लक्ष दिले असते तर नक्कीच मजा आली असती. अर्थात सनी देओलची अ‍ॅक्शन पहायलाच प्रेक्षक चित्रपटगृहाकडे जात असतो. तशी ती यातही आहेच. पण तेवढेच पहायला प्रेक्षक चित्रपटगृहाकडे येणार असा दिग्दर्शकाचा समज आहे का? असा प्रश्‍न पडतो आणि सनी तर आपले काम नक्कीच चोख पारही पाडतो. यात शंका नाही. प्रकाशराजही निराश करत नाही.

त्याची पत्नी नवोदित अभिनेत्री उर्वशी, बहिण अंजली जोडीला असणारे अमृता राव, जॉनी लिव्हर, संजय मिश्रा, यशपाल शर्मा आपापल्या भुमिका ठीक पार पाडतात. खास करून उर्वशीबाबत सांगायचे तर तो सुंदर दिसते एवढेच असो…

तर असा हा पुरेपूर मसालापट असून जर त्याला चांगल्या कथेची जोड असती तर नक्कीच प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या असत्या. पण तसे न होता फक्त सनी पाजीची अ‍ॅक्शन पहायची तर एकदा पाहायला काहीच हरकत नाही. मर्जी अपनी अपनी.

चित्रपट- ‘सिंग साहब द ग्रेट’
निर्माता- अनुज शर्मा, संगीता आहेर
दिग्दर्शक- अनिल शर्मा
कलाकार- सनी देओल, प्रकाशराज, उर्वशी राऊते, अमृता राव, जॉनी लिव्हर, इ.
दर्जा- **