प्रेमकथेचा कंटाळवाणा प्रवास

दिग्दर्शक पुनित मल्होत्राने ‘आय हेट लव्ह स्टोरी’, ‘मेरे ब्रदर की दुल्हन’ नंतर करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली ‘गोरी तेरे प्यार में’ या चित्रपटातुन एक वेगळी विनोदी प्रेमकथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे.करिना कपूर, इम्रान खान जोडीमुळे या चित्रपटा विषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता होती, मात्र कथानकातील कच्चे दुवे आणि नाविन्याचा अभाव यामुळे ही प्रेमकथा प्रेक्षकांच्या मनाला भिडत नही.

‘गोरी तेरे प्यार में’ या चित्रपटाची कथा बंगळुरू मधील तामिळ कुटुंबातला श्रीराम (इमरान खान) आणि दिल्लीच्या पंजाबी कुटुंबामधील दिया (करीना कपूर – खान)यांच्या भोवती गुंफण्यात आलेली आहे. या दोघांची पहिली भेट एका लग्न समारंभात दिल्लीत होते. पण, प्रेम मात्र बंगळुरूमध्ये भेतल्यावर जुळते. उच्चभ्रु घरात वाढलेल्या दियाला समाजासाठी काही तरी करण्याची इच्छा अहे, त्यासाठीच ती दिल्ली सोडुन बंगळूरू येथे एका स्वयंसेवी संस्थेत काम करते. दिया अतिशय हट्टी आणि मनमानी पद्धतीने वागणारी मुलगी आहे, तिचे वागणे मात्र श्रीरामला पटत नाही, त्यामुळे दोघांमध्ये सातत्याने झगडे सुरू असतात.

बंगळुरूमधील एका अनाथ आश्रमासाठीच्या जमीन विक्रीबाबत दोघांमधील वाद विकोपाला जातात आणि दोघे वेगळे होतात. त्यानंतर श्रीरामच्या घरचे त्याचे लग्न एका तामिळ कुटुंबातील मुलीबरोबर (श्रद्धा कपूर) ठरवतात. तो लग्नाला तयार होतो मात्र, ऐन लग्नातच श्रीरामला दियावर आपले किती प्रेम आहे त्याची जाणीव होते. त्याच भरात तो आपले लग्न सोडून दियाचा शोध घेण्यासाठी गुजरातमधील एका गावात पोहोचतो. तिथे दियाचे समाजकार्य जोमात सूरू असते, गावच्या नदीवर पुल उभारून गावकर्‍यांना दळवळणाचे साधन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे, तर दुसरीकडे श्रीरामला दियाला या गावातुन घेऊन जायचे आहे.

पुनीत मल्होत्राच्या या चित्रपटात अनेक उणिवा आहेत, कथानकात नविन काहीच नाही. कथेचा वेग अतिशय मंद आहे, दृष्य सूरू असताना आता काय घडणार किंवा संवाद काय अस्तील याची कल्पना प्रेक्षकाला सातत्याने येते. पुनीतचे या पुर्वीचे चित्रपट शहरातल्या युवावर्गाला डोळ्यांसमोर ठेवून तयार करण्यात आले होते पण, या वेळी त्याने चक्क गावाकडे आपला मोर्चा वळवला आहे. मात्र पुतीनला असलेली शहराची ओढ आणि करण जोहरच वैशिष्ट्ये असलेला श्रीमंतीचा बडेजाव याच सातत्याने दर्शन प्रेक्षकाला होते त्यामुळे कथानकातील नाटकीपणा, फोलपणा उघड होतो.

इम्रान खान कडुन अभिनया विषयी फार्‍रश्या अपेक्षा नसतातच मात्र त्याने या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा त्याच्या अभिनयाला मर्यादा असल्याचे दाखवुन दिले आहे. दियाच्या भुमीकेत करीना कपूर-खान सुंदर दिसते पण ती गावाच्या वातावरणातही शहरीच वाटते तसेच तीच्या भुमीकेसाठी तीने काही वेगळे प्रयत्न केल्याचे दिसत नाही. खलनायकाच्या भूमिकेतील अनुपम खेर निराश करतात. स्पेशलॅपिरियन्स मधील श्रद्धा कपूरही फारसा प्रभाव पाडु शकलेली नाही. विशाल – शेखरच संगीतही लक्षात राहत नाही. गोरी तेरे प्यार में ही एक प्रेमकथा असली तरी कुठेही रोमान्सला वाव नसल्यामुळे ही रोमान्सलेस प्रेमकथा प्रेक्षकांच्या मनाला भिडलेली नाही. एकंदरीत या प्रेमकथेचा कंटाळवाणा प्रवास न केलेला अधिक उत्तम ठरणार हे निश्‍चित.

चित्रपट – गोरी तेरे प्यार में
निर्माता – करण जोहर
दिग्दर्शक – पुनित मल्होत्रा
संगीत – विशाल – शेखर
कलाकार – इम्रान खान, करिना कपूर – खान, श्रद्धा कपूर, अनुपम खेर

Leave a Comment