नवी दिल्ली- आंतरराष्ट्रीय हॉटेल चेन मॅरिएट इंटरनॅशनल २०१७ -१८ सालापर्यंत भारतात १०० हॉटेल्स सुरू करणार असल्याचे एशिया पॅसिफिक विभागाचे संचालक व एम.डी. सायमन कूपर यांनी सांगितले. गेल्या दोन महिन्यात या चेनने बंगलोरमध्ये तीन तर दिल्लीत एक हॉटेल सुरू केले आहे. बंगलोरमध्ये देशातील पहिले रिटस कार्लटन सुरू करण्यात आले असून अन्य दोन मध्ये कार्पोरेट हॉटेल फेअरफिल्ड इन व जे. डब्ल्यू मॅरिएट यांचा समावेश आहे. दिल्लीत विमानतळ परिसरात जे. डब्ल्यू मॅरिएट नावानेच हॉटेल सुरू झाले आहे .
कूपर म्हणाले की आम्ही आत्तापर्यंत भारतात २३ हॉटेल्स सुरू केली आहेत. ताज मानसिंग हॉटेल लिलावात घेण्यासाठी आम्ही रियल इस्टेटमधील पार्टनरच्या शोधात आहोत. जेथे जेथे हॉटेल्स विकत घ्यायची असतील तेथे रियल इस्टेट क्षेत्रातील व्यक्तींशी भागीदारी केली जाणार आहे. सध्या ५० हॉटेल्सचे बांधकाम सुरू असून उघडण्यात येणार्या हॉटेल्सपैकी किमान ४० फेअरफिल्ड बँडने सुरू केली जातील कारण या कंपनीत आम्ही गुंतवणूक केली आहे. भारतात व्यवसायाच्या संधी मोठ्या आहेत. रिटस कार्लटन मुंबई आणि दिल्लीत नक्कीच असले पाहिजे यावर आमचा कटाक्ष आहे.