जपानी सम्राट, सम्राज्ञी भारत दौर्‍यावर

नवी दिल्ली – जपानचे सम्राट अकिही व सम्राज्ञी मिशिको तब्बल ५३ वर्षांनंतर पुन्हा एकदा भारत दौर्‍यावर येत असून त्यांचा हा दौरा ३० नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. गत भेटीतील आठवणींना या दौर्‍यात पुन्हा उजाळा देण्याचा प्रयत्न हे जोडपे करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

यापूर्वी २९ नोव्हेंबर १९६० मध्ये हे जोडपे भारतात आले होते मात्र तेव्हा ते युवराज आणि युवराज्ञी होते. त्यावेळी तेव्हाचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी त्यांचे पालम विमानतळावर स्वागत केले होते व त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला होता. त्यावेळी ते पंतप्रधान नेहरूंना भेटले होते व शाही मेजवानीलाही उपस्थित राहिले होते. यावेळी त्यांनी इंडिया इंटरनॅशनल सेंटरची कोनशीला बसविली होती. तसेच पतियाळा संग्रहालय, सहारणपूर मधील जपानी शेतकरी व श्रीनगर तसेच गयेतील बुद्धमंदिराला भेट दिली होती.

आता सम्राट ७९ वर्षांचे आहेत आणि ते या भेटीत फक्त दिल्लीतच राहणार असून ताज पॅलेसमध्ये उतरणार आहेत. मात्र या भेटीत ते लोधी गार्डनला भेट देणार आहेत. भारतातील मुक्काम शांततेत व्हावा अशी त्यांची इच्छा आहे. ३ डिसेबरच्या सेरेमोनियल रिसेप्शनला ते हजर राहणार आहेत. पंतप्रधान मनमोहनसिंग यांची भेट, राजघाटाचे दर्शन जवाहरलाल नेहरू विद्यापीठ व राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडची मेजवानी असे या जोडप्याचे अन्य कार्यक्रम आहेत.

Leave a Comment