आगामी निवडणुकीत महिला उमेदवारांना प्राधान्य – पवार

मुंबई – आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस महिलांना प्राधान्याने उमेदवारी देईल अशी घोषणा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी केली आहे. मुंबईत आज झालेल्या राष्ट्रवादी युवती मेळाव्यात शरद पवार बोलत होते.

येत्या अधिवेशनात संसदेत महिला आरक्षणासंदर्भात प्रस्ताव संमत व्हावा यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, असे त्यांनी सांगितले. यासाठी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांशी चर्चा झाल्याचेही ते म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना आरक्षण देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे आता विधीमंडळ आणि संसदेत महिलांना आरक्षण मिळाले पाहिजे, यासाठी राष्ट्रवादी आग्रही आहे. त्यामुळे फेब्रुवारीमध्ये होणार्‍या संसदेच्या अधिवेशनात तसा प्रस्ताव मांडला जाईल आणि त्यासाठी सर्व पक्षांची सहमती घेणार आहे, असेही पवार यांनी सांगितले.

मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये झालेल्या कार्यक्रमाला शरद पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. दरम्यान या कार्यक्रमापूर्वी शरद पवारांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तपासणी झाल्यानंतर आणि प्रकृती सुधारल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमधूल डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर पवारांनी थेट कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

Leave a Comment