एटीएममध्ये हल्ला झालेल्या महिलेच्या प्रकृतीत सुधारणा

बंगलोर – बंगलोरमधील एका एटीएम केंद्रात अज्ञात इसमाकडून हल्ला झालेल्या महिलेची प्रकृती आता सुधारत असून हल्लेखोराचा तपास मात्र अजून लागलेला नाही. काल हा हल्ला झाल्यानंतर तिला उजव्या बाजुला अर्धांग वायुचा झटका आला आहे. त्यावर येथील स्थानिक रूग्णालयात उपचार सुरू असून तिच्या प्रकृतीला असेला धोका आता टळला ओ असे रूग्णालय सूत्रांनी सांगितले.

या एटीएम केंद्रावर सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्यात आलेली नव्हती. तथापी त्यात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यामुळे हा सारा प्रकार काल दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखवण्यात आला त्यामुळे मोठीच खळबळ माजली होती.हल्लेखोराच्या हल्ल्यात जखमी झालेली महिला 38 वर्षीय असून ती बँक कर्मचारी आहे.

हल्लेखोराने तिच्या डोक्यावर कठीण वस्तुने प्रहार केल्याने तिच्या कवटीला फ्रॅक्चर झाले आहे. या कवटीचे हाड तिच्या मेंदूत घुसले असल्याने डॉक्टरांना तिच्यावर एक मोठी शस्त्रक्रीया करावी लागली आहे. तथापी या शस्त्रक्रियेनंतर तिची प्रकृती धोक्याच्या बाहेर गेली असून हंी महिला आता बोलू शकत आहे.

पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून त्यंानी सदर इसमाच्या शोधासाठी राज्यभर पोलिस पथके पाठवली आहेत असे बंगलोरचे पोलिस आयुक्त राघवेंद्र औरादकर यांनी सांगितले. ते म्हणाले की पोलिसांनी शहरातील एटीएम केंद्रांच्या सुरक्षेबाबत दोन वेळा बँक अधिकार्‍यांच्या बैठका घेऊन त्यांना योग्य त्या सुचना केल्या आहेत. ज्या ठिकाणी हा प्रकार झाला तेथे सुरक्षा रक्षक का तैनात नव्हता याची चौकशी केली जात आहे.