मोदींच्या प्रचार सभांचा प्रभाव मावळला

भोपाळ – भाजपचे नेते नरेंद्र मोदी यांची मध्यप्रदेशात प्रचाराच्या सुरूवातीच्या टप्प्यात असलेली क्रेझ आता ओसरत असल्याचा अनुभव भाजपच्या स्थानिक पदाधिकार्‍यांना येऊ लागला आहे. एका वाहिनीने दिलेल्या वृत्ता नुसार सात आठवड्यांपुर्वी मोदी यांच्या मध्यप्रदेशातील सभेला सात लाखांची गर्दी झाली होती परंतु त्यांच्या अलिकडेच येथे झालेल्या सभेला जेमतेम सात हजार लोकच उपस्थित होते.

त्यांच्या सागर, गुणा, छत्रपुर येथील सभांनाही जेमतेमच प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. त्यांच्या भोपाळ येथे झालेल्या सभेला जेमतेम सात हजार लोक उपस्थित होते.भोपाळच्या सभेसाठी मोदींचे हेलिकॉप्टर भोपाळ मध्ये लँड झाले तेव्हा सभेचा मांडव पुर्णपणे रिकामा होता त्यामुळे आयोजक धास्तावले. त्यांनी कशीबशी धावपळ करून एका स्थानिक कॉलेजातील दोन हजार विद्यार्थ्यांची येथे गर्दी जमवली त्यामुळे आयोजकांना थोडा तरी धीर आला. व त्यांची नामुष्की वाचली.

या संबंधात बोलताना प्रदेश भाजपचे प्रवक्ते हितेश वाजपेयी म्हणाले की सागर येथील सभेला मोदी हे जाहीर झालेल्या वेळेपेक्षा खूपच आधी पोहोचले त्यामुळे ते तेथे आले तेव्हा लोक जमण्यास प्रारंभ झाला होता. परंतु छत्रपुर, गुणा आणि भोपाळ येथे पुरेशी गर्दी झाली होती असे ते म्हणाले. सागर येथील मैदान पुर्ण रिकामे होते त्या विषयी मोदी यांनी भाजपचे स्थानिक खासदार भुपेंद्रसिंग याच्याकडे स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली होती. मैदान तो खाली है असे सांगत मोदींनी त्यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती.

खासदार भुपेंद्रसिंह हे यावेळी भाजपचे विधानसभेचे उमेदवार आहेत. गर्दीची वाट पाहण्यासाठी मोदींचे भाषणही लांबवण्यात आले. मोदींच्या आधी स्थानिक नेत्यांना बोलण्यास सांगून वेळ काढण्यात आला. सभेच्या ठिकाणी असलेल्या बॅरिकेट्स काढून टाकण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या. त्यामुळे गर्दी वाढेल अशी अपेक्षा होती. स्थानिक नेत्यानी गर्दीसाठी धावाधाव केल्यानंतर उपस्थित जमावाची संख्या दहा हजारावर गेल्यानंतर मोदींनी भाषण केले.

हा अनुभव लक्षात घेऊन मोदी गुणाला सभेला गेले असताना त्यांनी तेथे विमानातून उतरल्यानंतर प्रथम गर्दी किती जमली आहे असा सवाल स्थानिक पदाधिकार्‍यांना केला.पदाधिकार्‍यांनी सांगितलेला गर्दीचा आकडा ऐकून मोदीनी दशेरा मैदानाकडे सभेला जाण्याऐवजी हेलिपॅडच्या परिसरातच वेळ काढणे पसंत केले.

भोपाळच्या सभेला झालेली कमी गर्दी विषयी पत्रकारानी स्थानिक भाजप पदाधिकार्‍यांकडे विचारणा केली असता त्यांनी याबाबत दिलेले उत्तर अतिशय मासलेवाईक होते. त्यांनी सांगितले मोदींच्या जीवाला असलेला धोका लक्षात घेऊन आम्ही येथे फार गर्दी जमवण्याच्या भानगडीत पडलो नाही.