पहिली महिला बँक सुरू; पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई- देशातील सर्वात प्रभावी महिला, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधत महिलांना आर्थिक स्थैर्य देण्याच्या उद्देशाने पहिल्या महिला बँकेचे उद्घाटन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या हस्ते मंगळवारी येथे करण्यात आले. भारतीय महिला बँकेफची सुरुवात म्हणजे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचा विश्वास पंतप्रधानांनी या वेळी व्यक्त केला.

राजकारणात महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकारने 50 टक्के आरक्षणाची तरतूद केल्याने गरीब आणि दुर्बल घटकांतील महिला थेट राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आल्या. राजकारणाप्रमाणे महिलांचे आर्थिकदृष्टयाही सक्षमीकरण होणे गरजेचे होते. ही बाब लक्षात घेत अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी 2013च्या अर्थसंकल्पात भारतीय महिला बँकेफची घोषणा केली होती. त्यानुसार या बॅँकेची पहिली शाखा मंगळवारी मुंबईमध्ये सुरू करण्यात आली.

या वेळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, अर्थमंत्री पी. चिदंबरम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शिवाय कृषिमंत्री शरद पवार, राज्यपाल के. शंकरनारायणन, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल आणि डॉ. फारुख अब्दुल्ला आदी मान्यवर उपस्थित होते. कमी वेळात भारतीय महिला बॅँकफ सुरू केल्याबद्दल पंतप्रधानांनी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे कौतुक केले. या बँकेचा फायदा महिलांना आणि महिला बचत गटांना होणार आहे. ही बँक म्हणजे महिलांनी महिलांसाठी चालवलेली बँक असेल. त्यामुळे महिलांना यापुढे आपले आर्थिक व्यवहार स्वत: हाताळण्यास मदत होणार आहे. शिवाय आर्थिकदृष्टया दुर्बल आणि मागासवर्गीय महिलांना या बँकेचा थेट फायदा होणार असल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले.

जागतिक स्तरावर जवळपास 50 महिला या व्यावसायिक नेतृत्व करतात. त्यापैकी चार महिला या भारतीय आहेत. आतापर्यंत भारतीय महिलांनी सर्वच क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. आर्थिक क्षेत्रातही महिला या बँकेच्या माध्यमातून भरीव कामगिरी करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळूरु, अहमदाबाद आणि गुवाहाटी येथे या बँकेच्या प्राथमिक स्तरावर शाखा सुरू करण्यात येणार असून, मार्च 2014 पर्यंत ही संख्या 25 वर नेण्यात येणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

Leave a Comment