पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला बुधवारी तीन महिने पूर्ण झाले आहेत. मात्र त्यांच्या मारेक-यापर्यंत पोहोचण्यात पोलिसांना अद्यापही यश आले नाही. दाभोलकरांची २० ऑगस्ट रोजी पुण्यात अज्ञात मारेक-यांकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. तीन महिने उलटून गेले तरी या घटनेचा तपास पूर्ण झाला नाही. त्यामुळे पोलिस यंत्रणेच्या तपास कार्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या गुन्ह्याच्या तपासासाठी पुणे शहर, पुणे ग्रामीण, मुंबई, सातारा, नगर पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात तपास करण्यात आला. आतापर्यंत सुमारे दीड हजारांहून अधिक गुन्हेगारांकडे चौकशी करण्यात आली असून, यातून इतर २२ गुन्हे उघडकीस आले आहेत. मात्र, दाभोलकरांच्या मारेक-यांविषयी कुठलीही ठोस माहिती हाती लागलेली नाही.
गेल्या काही दिवसांपासून दहशतवादविरोधी पथकाकडून सातारा, कोल्हापूर आणि ठाणे परिसरातील काही संशयितांची चौकशी करण्यात आली असली, तरी त्यांच्या हातालाही फारसे काही लागलेले नाही. अनेक आरोपींवर पाळत ठेवण्यात येत आहे. मारेक-यांनी वापरलेली दुचाकी शोधण्यासाठीही पोलिसांकडून कसून प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांनी सादर केलेल्या स्केचेसवरुनही मारेक-यांची ओळख पटलेली नाही. मारेकरयांचे कोणतेही धागेदोरे मिळत नसल्याने पुणे पोलिसांच्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थिती केले जात आहेत.