नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय ख्यातीचे रसायन शास्त्रज्ञ डॉ. सी.एन.आर. राव ऊर्ङ्ग चिंतामणी नागेश रामचंद्र राव यांनाही भारतरत्न किताब देण्याची घोषणा काल शनिवारी राष्ट्रपती भवनातून करण्यात आली आहे. ७९ वर्षे वयाचे डॉ. राव हे पंतप्रधानांच्या शास्त्रीय सल्लागार परिषदेचे अध्यक्ष आहेत. घनस्थिती रसायन शास्त्र आणि संरचनात्मक रसायन शास्त्र या विषयावरील संशोधनात ते जगभर प्रसिद्ध आहेत.
भारतरत्न किताब मिळविणारे डॉ. राव हे तिसरे शास्त्रज्ञ ठरले आहेत. यापूर्वी १९५४ साली डॉ. चंद्रशेखर व्यंकट रमण आणि १९९७ साली डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम या दोन शास्त्रज्ञांना देशातल्या या सर्वोच्च मानाच्या प्रतिष्ठेच्या नागरी किताबाने सन्मानीत करण्यात आलेले आहे. डॉ. राव यांना यापूर्वी म्हणजे गतवर्षीच पद्मविभूषण किताब देण्यात आला होता. त्याशिवाय डॉ. राव यांना आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.
डॉ. राव यांचा जन्म ३० जून १९३४ रोजी मंगळूरमध्ये झाला. त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठात उच्च शिक्षण घेतले आणि नंतर अमेरिकेच्या पर्ड्यू विद्यापीठातून पीएच.डी. केली. जगातल्या ६० विद्यापीठांनी त्यांना मानद पदव्या दिलेल्या आहेत. शालेय शिक्षण घेत असताना डॉ. राव यांनी स्वातंत्र्य चळवळीत सहभाग नोंदविला होता. भारताने गेल्याच आठवड्यात मंगळावर सोडलेल्या पहिल्या मोहिमेचे नियोजन करण्यात डॉ. राव यांचा सिंहाचा वाटा आहे.