रजत पडद्यावरचा ‘खेळ’… ‘तेंडुलकर आऊट’

दोन वर्षांपूर्वी तयार होऊनही प्रदर्शनासाठी मात्र काही कारणाने रखडलेला ‘तेंडुलकर आऊट’ आता प्रदर्शित झाला आहे. खरं तर संपूर्ण जगाचे लक्ष ‘सचिन तेंडुलकर’च्या निवृत्तीमुळे त्याच्याकडे लागलेले असताना हा चित्रपट प्रदर्शित होणे हे ठरवून केलेले काम असावे, असे वाटते. कारण सचिन तेंडुलकरची निवृत्ती आणि चित्रपटाचे नाव ‘तेंडुलकर आऊट’ असता क्रिकेट आणि सिनेरसिक यांचा दुहेरी फायदा घेता येईल, अशी समीकरणं मांडली गेली असावीत. असो.

या चित्रपटाबाबत सांगायचं तर एका दिवसात घडणारी ही गोष्ट तीन पातळ्यांवर घडताना दिसते. सिनेनिर्माता असणार्‍या तेंडुलकरचे (सयाजी शिंदे) अनेक अभिनेत्रींशी विवाहबाह्य संबंध आहेत. त्याची बायको सुनंदा (नीलम शिर्के) आणि तो सचिनचे प्रचंड चाहते आहेत. या सुनंदाचेही अफेअर आहे ते धनु (अतुल परचुरे) बरोबर. तर अशा या श्री व सौ. तेंडुलकरांना सुनंदाचे डिलिव्हरीचे दिवस पूर्ण होत आले असताना प्रत्येकाप्रमाणेच आपला मुलगा सचिनच्या वाढदिवसाच्या दिवशीच जन्माला यावा, असे वाटत असते.

तर दुसरीकडे सिनेनिर्मितीसाठी अंडरवर्ल्डकडून पैसा घेत असलेला तेंडुलकर त्याचे चित्रपट आपटल्याने कर्जबाजारी झालेला असतो. त्याला आता अंडरवर्ल्डकडून पैशासाठी धमक्या येऊ लागलेल्या असतात आणि अंडरवर्ल्ड तेंडुलकरला आऊट (मारून टाकण्याची) करण्याची सुपारी नायर (संतोष जुवेकर), अब्बास (विजय मौर्य) आणि लेफ्टी (अनिकेत विश्‍वासराव) या तिघांना देतो. ज्यावेळी तेंडुलकर आपली प्रेयसी वेल्वेटला (सई ताम्हणकर) भेटायला रात्री पबमध्ये जातो तेव्हा या तिघांना त्याची गेम करायची असते… मग…

दिग्दर्शक स्वप्नील जयकरचा हा पहिला चित्रपट असला तरी तसे जाणवत मात्र नाही. यातील घडामोडी डे नाईट सामन्याच्या वेळी घडत असल्याने त्यावेळी क्रिकेटमध्या कॉमेंट्रीचा वापर करण्याची त्याची कल्पना उत्तमच. कथेतील पात्रांच्या मागणीनुसार झालेली कलाकारांची निवड योग्यच. यात प्रामुख्याने सयाजी शिंदे, अतुल परचुरे, अनिकेत विश्‍वासराव, संतोष जुवेकर, प्रवीण मौर्य, नीलम शिर्के यांची नावे घेता येतील.
गीत- संगीताबाबत सांगायचे तर संपूर्ण सिनेमात एकच पबमध्ये चित्रित करण्यात आलेले हिंदी गाणे आहे ते ठीक आहे.
म्हणजे योग्य वेळ साधून प्रदर्शित झालेला हा चित्रपट एकदा तरी पाहायला काहीच हरकत नाही.
निर्माता- सुधा प्रॉडक्शन
दिग्दर्शक- स्वप्नील जयकर
कलाकार- सयाजी शिंदे, नीलम शिर्के, सई ताम्हणकर, संतोष जुवेकर, अनिकेत विश्‍वासराव, अतुल परचुरे, विजय मौर्य.
दर्जा- **

Leave a Comment