राज्यातील विमानतळ प्रकल्प जलदगतीने उभारणार

मुंबई- नवी मुंबई विमानतळ, पुणे जिल्ह्यातील चाकण विमानतळ आणि इतर विविध वाहतूक प्रकल्पांसह राज्यातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना केंद्र सरकारकडून हिरवा कंदील मिळाल्याने हे प्रकल्प मार्गी लागणार आहेत. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर या प्रकल्पाला गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी दिली.

पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या चर्चेच्या वेळी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि योजना आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. मॉन्टेकसिंग अहलुवालिया उपस्थित होते. मुख्यमंत्री चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने पंतप्रधानांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. दीड तास चाललेल्या या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया उपस्थित होते.

या भेटीत नवी मुंबई विमानतळ, पुणे जिल्ह्यातील चाकण येथील विमानतळाबाबत पायाभूत सुविधा, मुंबईतील चर्चगेट ते विरार या उपनगरीय एलिवेटेड रेल्वे कॉरिडॉर, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल), डॉपलर रडार यंत्रणा, मेट्रो कॉरिडॉरच्या तिस-या टप्प्यास चालना देण्याबाबत तसेच नवी मुंबई भागातील मिठागरांबाबत अध्यादेशातील सुधारणा शिथिल करण्यासंदर्भात चर्चा झाली. प्रस्तावित नवी मुंबई विमानतळाचा प्रश्न गेल्या 10 वर्षापासून प्रलंबित होता. आता हा प्रश्न मार्गी लागल्याने हे विमानतळ तयार झाल्यावर दरवर्षी कोटयवधी हवाई प्रवाशांची सोय होणार आहे. हे विमानतळ देशातील सर्वात मोठे ग्रीनफिल्ड विमानतळ ठरणार आहे.

दरम्यान चर्चगेट ते विरार या उपनगरीय एलिवेटेड रेल्वे कॉरिडॉर प्रकल्प निर्धारित कालमर्यादेत पूर्ण होण्याबाबत आवश्यक मंजुरी व निधी केंद्र शासनाकडून उपलब्ध करून देण्याबाबतची विनंती मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत केली. शिवाय शिवडी ते नाव्हा शेवा दरम्यानच्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या प्रगतीबाबत या बैठकीत चर्चा झाली. या प्रकल्पासाठी केंद्राकडून 90 टक्के आथक मदत देण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

Leave a Comment