मुंबईत स्कोडाच्या धडकेत सात वर्षांच्या मुलाचा मृत्यू

मुंबई – मुंबईतील अंधेरीमध्ये रात्री हिट अ‍ॅण्ड रनची आणखी एक घटना घडली. भरधाव वेगात असलेल्या स्कोडा कारने दिलेल्या धडकेत एक सात वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.

इरफान सय्यद असं मृत मुलाचं नाव आहे. इरफान रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या स्कोडा कारने त्याला जोरात धडक दिली, यात तो गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा कूपर हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

या प्रकरणी डी.एन. नगर पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतलं आहे. त्याच्यावर कलम 304 (अ) अंतर्गत निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आहे. तसंच तो दारुच्या नशेत गाडी चालवत होता का, याचा पोलिस तपास करत आहेत.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार कारमध्ये दोन मूलीही होत्या. मुंबईत गेल्या तीन दिवसात हिट अ‍ॅन्ड रनचा हा तिसरा बळी ठरला आहे. याआधी मंगळवारी रात्री उशीरा दोन कारमध्ये झालेल्या धडकेत एका महिला डॉक्टरचा मृत्यू झाला होता. तर बुधवारी रात्री झायलो कारने रेशन दुकानदाराला चिरडलं, यात त्याचा जागीच मृत्यू झाला. तसंच या सर्व अपघातांमध्ये चार जण गंभीररित्या जखमी झाले आहेत, त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Leave a Comment