अण्वस्त्रवाहू ’अग्नी 1’ ची यशस्वी चाचणी

बालासोर – नुकतेच मंगळयाना’च्या यशस्वी प्रक्षेपणाने अवकाशात तिरंगा फडकवल्यानंतर भारताने आज 700 किलोमीटरपर्यंत जमिनीवरून जमिनीवर मारा करू शकणार्‍या पुर्णपणे स्वदेशी बनावट असलेल्या अग्नी 1’ या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे.

ही चाचणी ओडिशाच्या व्हीलर बेटावर घेण्यात आली. याबाबत माहिती देताना या प्रकल्पाचे संचालक एम. व्ही. के. व्ही. प्रसाद यांनी सांगितले की, या चाचणीदरम्यान या क्षेपणास्त्राने बंगालच्या उपसागरातील लक्ष्याचा अचूक वेध घेतला आहे. तसेच रडार व सागरी तटालगतच्या केंद्रांमधून या क्षेपणास्त्राच्या प्रवासाचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे.’

या क्षेपणास्त्राचे वजन 12 टन असून याची लांबी 15 मिटर एवढी आहे. या क्षेपणास्त्राची ओझे पेलण्याची क्षमता एक टनाएवढी आहे. चाचणीपूर्वीच या क्षेपणास्त्राला भारतीय लष्कराच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आले आहे. लष्कराच्या नियमित प्रशिक्षणाचा भाग म्हणून आज ही चाचणी घेण्यात आली आहे. यापूर्वी लष्कराकडून डिसेंबर 2012 मध्ये अग्नी 1’ ची चाचणी करण्यात आली होती.

Leave a Comment