रितेशचे डिझाइन आवडले शाहरूखला

बॉलिवूडमध्येा गेल्याक काही दिवसांपासून अभिनयासोबतच इतर काही तरी करायची चुणूक सर्वांना लागली आहे. हे अभिनेते कधी चित्रपट निर्माता म्हणून, कधी स्टेज शो करून पैसे कमावतात. अभिनेता रितेश देशमुखने अभिनय सांभाळून आणखी एक व्यवसाय मनापासून जपला आहे. तो म्हणजे अंतर्गत सजावटीचा. नुकतेच रितेशने डिझाइन केलेले ‘रेड चिलीज् एण्टरटेन्मेंट’चे कार्यालय शाहरुख खानला खूपच आवडले आहे.

कमला रहेजा विद्यानिधी इन्स्टिटय़ूट फॉर आर्किटेक्चर अॅतण्ड एनव्हायरन्मेंटल स्टडीज या संस्थेतून रितेशने आर्किटेक्चरची पदवी घेतली आहे. मात्र त्याला त्याची वाट सापडली ती अभिनय क्षेत्रात. पण मधूनमधून रितेश आपला हा मूळ व्यवसायही सांभाळतो. मध्यंतरी शाहरुख खानच्या ‘रेड चिलीज् एण्टरटेन्मेंट’चे कार्यालय सजविण्याची जबाबदारी रितेशवर येऊन पडली. रितेशने जे ‘रेड चिलीज्’चे कार्यालय डिझाइन केले ते शाहरुखला इतके आवडले की, त्याने ट्विटरवरून रितेशचे तोंडभरून कौतुक केले.

याआधीही रितेशने दिग्दर्शक करण जोहरचे वांद्रे येथील युनियन पार्कमधील घर डिझाइन करून दिले होते. सिनेनिर्माता म्हणूनही रितेश सध्या ‘लय भारी’ काम करतो आहेच; पण ज्यात आपण शिक्षण घेतले आहे त्याचाही तो आपल्याच क्षेत्रातील सहकलाकारांसाठी चांगला उपयोग करून घेत आहे. त्यामुळे त्याचे कौतुकही केले जात आहे.

Leave a Comment