दुबई – जगातील सर्वांत मोठा विमानतळ नुकताच प्रवाशांच्या सेवेसाठी खुला करण्यात आला आहे. दुबई येथे रविवारी अल मक्टौम आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले आहे. बुडापेस्ट येथून सुमारे 100 प्रवाशांना घेऊन येणारे विमान रविवारी अल मक्टौम आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले आणि प्रवाशांनी आश्चर्यचकित होऊन या विमानतळाची मुक्तकंठाने स्तुती केली.
संयुक्त अरब अमिराती या इस्लामिक देशाने बराच काळापासून स्वीकारलेली आधुनिकता आणि विकासाचे प्रतिबिंब त्या देशातील सरकारच्या नागरी उड्डाण क्षेत्रावरील धोरणात उठून दिसते. दुबई हे शहर आंतरराष्ट्रीय नकाशावर सर्वाधिक उड्डाणे होणारे शहर म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र दुबई शहराबद्दलचे जगभरातील प्रवाशांचे वाढते आकर्षण आणि पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी सरकारने एका अत्यंत सुंदर असा विमानतळ बांधणीचा प्रकल्प हाती घेतला आणि दुबई शहरात हा मक्टौम आंतरराष्ट्रीय विमानतळ उभा राहिला. हा जगातील सर्वांत मोठा विमानतळ ठरला आहे.
या विमानतळाच्या बांधणी आणि सुशोभिकरणासाठी सुमारे 32 लक्ष अमेरिकन डॉलर्स खर्च करण्यात आलेले आहेत. या विमानतळाचे काम अद्यापही सुरू आहे. या विमानतळावर पाच हवाई धापट्ट्या उभारण्यात येत आहेत. वर्षाकाठी या विमानतळावर 1 अब्ज 60 लाख प्रवासी उड्डाण करू शकतील अशा पायाभूत सुविधा या विमानतळावर उभारण्यात येत आहेत. सरकार या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर हात मोकळे ठेवून खर्च करीत आहे. कारण पर्यटन आणि नागरी उड्डाण क्षेत्रांचे मोठे आर्थिक योगदान या देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात राहिलेले आहे.
सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा 28 टक्के वाटा एकट्या नागरी उड्डाण क्षेत्राकडून या देशाला प्रतिवर्षी मिळत असतो. यातील बहुतांश उत्पन्न दुबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाकडून मिळत असते. मात्र दुबईचे विमानतळ हे जगातील सर्वाधिक व्यस्त असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळांपैकी एक असून सुविधांच्या बाबतीत त्याचा चौथा क्रमांक लागतो. या विमानतळावरील भार आता मक्टौम आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे बराच कमी होणार आहे. जगभरातील नागरिकांना पर्यटन आणि आपल्या संस्कृतीची, आदरातिथ्याची संधी उपलब्ध करून देण्या बरोबरच जागतिक स्तरावरील व्यावसायिक दारे उघडी करण्यासाठी आधुनिकीकरणाचा आणि नाविन्याचा ध्यास घेतलेल्या अमिरातीचा हा एक चांगला प्रयत्न आहे, अशी माहिती दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पॉल ग्रीफिथ्स यांनी दिली आहे.