पवार बॉंब

केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीची हवा तापत असतानाच राहुल गांधी यांच्यावर बॉंब टाकला आहे. राहुल गांधी यांनी आजवर अनेकदा संधी चालून आली असतानाही आपले प्रशासन कौशल्य सिद्ध केलेले नाही म्हणून त्यांना आपण पंतप्रधानपदाला योग्य मानत नाही असे पवार यांनी प्रतिपादन केले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी या बाबत काही बोलायला नकार दिला होता. आपली कॉंग्रेसशी आघाडी आहे. कॉंग्रेस पक्ष मोठा पक्ष असल्याने त्या पक्षाचा नेताच पंतप्रधान होणार. तो कोण असावा हे त्यांनी ठरवायचे आहे. कॉंग्रेस पक्ष ज्याला नेता निवडेल तो आपल्याला मान्य असेल असे ते म्हणाले होते. आता त्यांनी घूमजाव केले आहे. पण पूर्वी राहुल गांधी आणि पवार यांच्यातले मतभेद दिसून आले होते. एकदा राहुल गांधी यांनी महागाईला घटक पक्ष जबाबदार असल्याचा आरोप केला होता. तेव्हा पवारांना ङ्गार राग आला होता. त्यांनी राहुल गांधी यांना, आघाडी सरकार कसे चालवावे हे इटलीत जाऊन शिकून येण्याचा सल्ला दिला होता. पवार आघाडी असल्याचे सांगत असले आणि कॉंग्रेसशी मैत्री असल्याचे सांगत असले तरी त्याना मनातून राहुल गांधी यांच्या विषयी राग आहे हे काही लपून रहात नाही. तोच राग आता प्रकट झाला आहे. त्याला नेमके निमित्त काय झाले हे माहीत नाही पण पवारांनी राहुल गांधी यांच्यावर ङ्गार मोक्यावर टिप्पणी केली आहे.

आपण आगामी काळात राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काम करू शकणार नाही अशा शब्दात आपल्या पुढच्या धोरणांचे सुतोवाच केले आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला लोकसभेच्या नेमक्या किती जागा मिळणार आणि आगाम केंद्रीय राजकारणात त्यांची भूमिका किती निर्णायक ठरणार या गोष्टी अजून तरी अंधूक आहेत त्यामुळे राहुल गांधींविषयी त्यांनी व्यक्त केलेले मत हे राहुल गांधी यांच्या भवितव्यावर कितपत परिणाम करू शकणार आहे याबाबत संदिग्धता आहे. पण पवार बोलले ते सत्य आहे हे नाकारता येत नाही. राहुल गांधी आणि शरद पवार यांच्या वयात सुमारे ३० वर्षांचे अंतर आहे. वयातल्या अंतराचे परिणाम प्रशासनात खूप होत असतात. कारण प्रत्येक पिढी आपल्या पध्दतीने विचार करत असते. त्यांच्या मंत्रिमंडळात काम करणे पवारांना कसे शक्य होईल? काही लोक वयाने कमी असतात. पण त्यांची आकलन शक्ती आणि समज ङ्गार मोठी असते. तेव्हा असे लोक आपल्यापेक्षा वयाने कितीही मोठे असलेल्या लोकांना छान हाताळू शकतात. किंबहुना शरद पवार यांची तरुणपणाची तयारी अशीच होती.

राहुल गांधीपेक्षा वयाने कितीतरी कमी असताना त्यांनी महाराष्ट्रात अनेक पक्षांचे आघाडी सरकार व्यवस्थित हाताळले होते. राहुल गांधी यांच्यामध्ये तीही क्षमता नाही. राहुल गांधींची क्षमता आणि त्यांची कुवत याविषयी ङ्गार काही लिहिण्याची गरज नाही परंतु आपली कुवत दाखवून देण्याची चांगली संधी असतानाही त्यांनी ती दाखवून देण्यापासून पाय मागे घेतला आहे. ही त्यांच्या वाटचालीतली ङ्गार मोठी चूक आहे. २००४ साली राहुल गांधींनी मनमोहनसिंग यांच्या मंत्रिमंडळात एखादे मंत्रीपद मागितले असते तर त्यांना मिळाले असते. तसे ते स्वीकारून राहुल गांधी यांना आपले प्रशासकीय कौशल्य दाखवून द्यायला हवे होते. त्यांनी ते टाळले. परिणामी शरद पवारांना या उणीवेवर बोट ठेवण्याची संधी मिळालेली आहे. राहुल गांधी यांच्या व्यक्तीमत्वातील हा दोष हाच नरेंद्र मोदी यांच्या पथ्यावर पडला आहे. नरेंद्र मोदी यांनी मात्र गेल्या बारा वर्षापासून आपले प्रशासकीय कौशल्य दाखवून दिले आहे. अनेकांकडून शाबासकी मिळवलेली आहे आणि त्यामुळे भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची घोषणा होताच देशातल्या जनतेच्या मोठ्या गटाने त्यांना समर्थन द्यायला सुरूवात केली आहे. आज राष्ट्रीय पातळीवर भावी पंतप्रधान म्हणून मोदी आणि राहुल गांधी यांची तुलना होते तेव्हा राहुल गांधी मागे पडतात.

एका बाजूला पवार राहुल गांधी यांचा दोष दाखवतात पण मोदी यांनी आपले प्रशासकीय कौशल्य सिध्द केले असूनही त्यांच्या नावाला मात्र मान्यता देत नाहीत. राहुल गांधी यांच्याविषयी दिलेल्या या मुलाखतीत पवारांनी नरेंद्र मोदी यांच्यावरही काही टिप्पणी केली आहे. ती काही आजची नाही. बर्‍याच दिवसांपासून ते ती करत आहेत. मोदी यांची उमेदवारी ङ्गार आधी जाहीर झाली ही त्यांना चूक वाटते. जे ङ्गार आधी नावे जाहीर करतात ते पुढे स्पर्धेत मागे पडतात असे पवारांचे म्हणणे आहे. मात्र पवारांचे राहुल गांधींविषयीचे मत जेवढे तर्कशुध्द आहे. तेवढे मोदीविषयीचे मत तर्कशुध्द वाटत नाही. नाव आधी जाहीर केल्याने पुढे तो उमेदवार मागे पडतो. असे सगळ्यांच्याच बाबतीत घडलेले नाही. काही नेत्यांना प्रदीर्घकाळ चर्चा होऊनही त्यांना पंतप्रधानपद मिळालेले आहे. इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी यांची नावे ङ्गार पूर्वी जाहीर झालेली होती. वाजपेयी यांना तर प्रत्यक्ष पंतप्रधान होण्याच्या आधी २५ वर्षापासून भारताचे भावी पंतप्रधान म्हटले जात होते. पण त्यामुळे त्यांचे पद हुकले असे काही घडलेले नाही. ही गोष्ट मात्र पवारांच्या बाबतीत मात्र घडली आहे. मोदी यांच्याबाबतीत असेच होईल या पवारांच्या भाकितात काही तर्कशुद्धता दिसत नाही.